इंदापूरचे कोविड सेंटर पेशंटच्या शोधात 

इंदापूरचे कोविड सेंटर पेशंटच्या शोधात

इंदापूर तालुक्यात सध्या कोरोनाने हाहाकार माजवला आहे. तालुक्यातील नागरिकांना बेड मिळवण्याकरिता वणवण हिंडावे लागत आहे. तसेच बेड उपलब्ध नसल्याने काही रुग्णांना जमिनीवर गादी टाकून उपचार घ्यावे लागत आहे. तर काहींना ऑक्सिजन बेड अभावी मृत्यू ला सामोरे जावे लागत आहे. अशी भयंकर परिस्थिती तालुक्यात उद्भवली आहे.

वास्तविक पाहता राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे इंदापूर येतील धावत्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी एका शैक्षणिक संस्थेमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले होते की, तरंगवाडी येथील शासकीय शाळेमध्ये १३० बेड चे कोविड केअर सेंटर उभारणार असल्याचे ठणकावून सांगितले होते. त्याचप्रमाणे इंदापूर कॉलेज या ठिकाणी ५० बेड चे कोविड सेंटर उभारणार असल्याचे सांगितले.

सद्य परिस्थिती पाहता इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयामध्ये सध्या ५० बेड चे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. परंतु मंत्री महोदय यांनी सांगितल्या प्रमाणे तरंगवाडी येथील १३० बेड च्या कोविड सेंटर च्या उभारणी साठी त्यांनी जि. प. चे मुख्यकार्यकारी अधिकारी व संबंधित सर्व अधिकाऱ्यांचा फौजफाटा घेऊन तेथील शाळेची प्रत्यक्षात पहाणी केली व अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. या घटनेला आता एक आठवडा उलटून गेला आहे.

मध्यंतरी प्रशासनाकडून काही दिवसांपूर्वी इंदापूर येथील विद्याप्रतिष्ठान संकुलामध्ये १०० बेड चे कोविड केअर सेंटर उभारले व ते ताब्यात घेतले आहे. हे सेंटर उभारणीवेळी या ठिकाणी राज्यमंत्री यांच्या पुत्राने येऊन मी किती काम करतो हे दाखवण्याकरिता तेथील कोविड सेंटर करिता आवश्यक असणाऱ्या गाद्या, उश्या, बेड उचलण्याचे काम केले.

प्रशासनाने घाई गडबडीमध्ये विद्याप्रतिष्ठान येथील कोविड केअर सेंटर मधील १०० बेड हे मधुचंद्राच्या रात्रीसाठी जसे सजवले जातात अगदी तसेच फक्त गाद्या आणि उश्या टाकून सजवलेले असल्याचे दृश्य आहे.

सध्या तालुक्यातील नागरिक हा बेड साठी तालुकाभर व तालुक्याच्या बाहेर, जिल्ह्याच्या ठिकाणी वणवण हिंडूनही त्याच्या पदरी निराशा मिळत आहे. तालुक्यामध्ये ऑक्सिजन बेड ची कमतरता जाणवत आहे. ऑक्सिजन बेड न मिळाल्यामुळे रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

वास्तविक पाहाता नागरिकांना आरोग्य अधिकारी, सेवक कर्मचारी, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर औषधे, गोळ्या, रेडमिसिव्हर इंजेक्शन इत्यादी आरोग्याच्या सोई-सुविधा असलेले कोविड सेंटर उभारण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे, मात्र याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

या समस्येविषयी लोकप्रतिनिधींना प्रसार माध्यमांनी विचारल्यास लोकप्रतिनिधी हे बेड न मिळणे,ऑक्सिजन बेड न मिळणे, रेडमिसिव्हर न मिळणे ही समस्या फक्त इंदापुरातच नाही असे सांगतात व दिड-दीड लाख दिले तरीही कोणीही आरोग्य अधिकारी कामावर येत नसल्याचे उत्तरे देऊन मोकळे होत आहेत.

खुद्द राज्यमंत्री यांनी जाहीर केलेल्या तरंगवाडी येथील १३० बेडच्या कोविड सेंटर विषयी अधिक माहिती घेतली असता त्या ठिकाणी फक्त मंत्री महोदय यांची पाहणी झाली आहे. कोविड सेंटर उभे करण्याविषयी आमच्याकडे कोणताही पत्रव्यवहार झाला नसल्याचे तेथील अधिकारी वर्गाकडून समजले.

सध्या एका ऑक्सिजन बेड साठी चौदा जणांची प्रतिक्षा पणाला लागत आहे.तेरा जणांना बेड मिळणे मुश्कील झाले आहे. तर दुसरीकडे गोडबोले मामा हे जनतेला फक्त गोड गोड बोलून आपली वेळ मारुन नेत असल्याची चर्चा सध्या तालुक्यातील नागरिक करीत आहेत.