वनराज्यमंत्र्यांच्या तालुक्यातच वनविभागाच्या कारवाईला त्रासून महिलेच्या विषप्राशनाची घटना निषेधार्ह :- मा.सहकार मंत्री.हर्षवर्धन पाटील.

ववनराज्यमंत्र्यांच्या तालुक्यातच वनविभागाच्या त्रासाला कंटाळून आजोती येथील सुमन ज्ञानदेव गुटाळ या महिलेने विषप्राशन केल्याची दुर्दैवी घटना आज दि. ८ रोजी घडली. ही विषप्राषनाची घटना निषेधार्ह असल्याचे मत राज्याचे माजी सहकारमंत्री तथा भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली.

दरम्यान हर्षवर्धन पाटील यांनी सुमन गुटाळ यांची इंदापूर येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयामध्ये भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली व त्यांचेवर सुरु असलेल्या वैद्यकीय उपचाराची माहिती येथील डाॅक्टरांकडून घेतली.

हर्षवर्धन पाटील म्हणाले, दि. ८ रोजी गुरुवारी इंदापूर तालुक्यातील आजोती येथील सुमन ज्ञानदेव गुटाळ यांना वनविभागाने कोणतीही नोटीस दिली नाही. तसेच त्यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तसेच सध्या राज्यावर, जिल्ह्यात व तालुक्यात असणार्‍या कोरोना महामारीच्या संकटातही वनविभागाने आपली संपूर्ण यंत्रणा घेऊन या गरीब महिलेचा संसार उध्वस्त करण्याचा प्रयत्न केल्याने शेवटी या महिलेने या वनविभागाच्या कारवाईला त्रासून विष प्राशन केले असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

महिलेने विष प्राशन केले असताना तेथील वनविभागाच्या कोणत्याही यंत्रणेने त्यांना मदत केली नाही, शेवटी त्यांना मोटारसायकलवर या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. डॉक्टरांनी वेळेत उपचार केल्याने त्यांचा जीव वाचवला असल्याचे सांगून हर्षवर्धन पाटील यांनी डॉक्टरांचे आभार मानले.

वास्तविक पाहता या वन विभागाचे राज्यमंत्री या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. ते वन खात्याचे मंत्री असतानादेखील अधिकारी कोणत्याही प्रकारची नोटीस न देता कारवाई करत आहेत. गेल्या सहा महिन्यांपूर्वी देखील ११ गावात जेसीबीने घरे पाडली, पोल्ट्री उध्वस्त केल्या. आज या महिलेवर अन्याय होत असेल तर ही बाब निषेधार्थ असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, कोर्टामध्ये हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना कोणत्याही प्रकारची नोटीस न देता अशाप्रकारची हुकूमशाही करणे गोरगरिबांच्या विरोधात काम करणे याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आम्ही सर्वजण त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या पाठीशी ठाम आहोत. उपचारासंदर्भात आम्ही डॉक्टरांशी चर्चा केली आहे. आजची घटना ही माणुसकीला काळिमा फासणारी असल्याचे हर्षवर्धन पाटील म्हणाले.

_____________________________

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!