भाजपाचे सिंधुदुर्गवर निर्विवाद वर्चस्व ; ७७ पैकी ४१ नगरसेवक भाजपाचे

४ पैकी ३ नगरपरिषदांमध्ये भाजपाचे बहुमत

जनतेचा कौल भाजपाला

जिल्हापरिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपाचे पारडे जड..

सिंधुदुर्ग :- जिल्ह्यातील सावंतवाडी, वेंगुर्ले, मालवण आणि कणकवली या चार नगरपरिषदांसाठी पार पडलेल्या निवडणुकांत भाजपने ठोस वर्चस्व सिद्ध केले आहे. चारपैकी तीन नगरपरिषदांमध्ये भाजपचा निर्णायक प्रभाव असून एकूण ७७ नगरसेवकांपैकी तब्बल ४१ नगरसेवक भाजपचे निवडून आले आहेत. या निकालातून जिल्ह्यात जनतेचा स्पष्ट कौल भाजपलाच मिळाल्याचे दिसून येते.

सावंतवाडी व वेंगुर्ले या दोन्ही नगरपरिषदांमध्ये भाजपाने नगराध्यक्ष पदासह स्पष्ट बहुमत मिळवले आहे. या निकालामुळे सावंतवाडी मतदारसंघातील विद्यमान आमदार व माजी मंत्री दीपक केसरकर यांना मोठा धक्का बसला असून त्यांच्या मतदारसंघातील दोन्ही नगरपरिषदा भाजपकडे गेल्या आहेत. या भागात भाजपाने पुन्हा एकदा आपले संघटनात्मक व राजकीय वर्चस्व ठामपणे सिद्ध केले आहे.

मालवण नगरपरिषदेत शिंदे शिवसेनेचा नगराध्यक्ष निवडून आला असला तरी आवश्यक ११ नगरसेवकांचे बहुमत त्यांना मिळवता आलेले नाही. त्यामुळे सत्तास्थापन व कारभारासाठी त्यांना भाजपाच्या पाठिंब्याची गरज भासणार आहे. कणकवली नगरपरिषदेत नगराध्यक्षपदी शहर विकास आघाडीचा उमेदवार निवडून आला असला, तरी १७ पैकी ९ नगरसेवक भाजपचे असल्याने शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपच्या सहकार्याशिवाय पर्याय उरणार नाही.

एकूण निकालांचा विचार करता, ७७ नगरसेवकांपैकी भाजपा – ४१, शिंदे शिवसेना – १७, अपक्ष (शहर विकास आघाडीसह) – ९, उबाठा शिवसेना – ९ आणि काँग्रेस – १ असे बलाबल स्पष्ट झाले आहे. दोन आमदार असूनही शिंदे शिवसेनेला जिल्ह्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष होता आले नाही, तर भाजपनेच आघाडी घेत जिल्ह्यातील नेतृत्व आपल्या हातात ठेवले आहे.या निकालांचा परिणाम येत्या काही दिवसांत होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवरही दिसून येणार असून, त्या निवडणुकांत भाजपाचे पारडे जड राहण्याची चिन्हे स्पष्टपणे उमटत आहेत. जनतेचा वाढता कौल, विश्वास आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मिळालेली ताकद पाहता, सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपाचे वर्चस्व आणखी भक्कम होण्याची शक्यता आहे.

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!