सोमवारपासून पुणे शहराची पाणी कपात रद्द करण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे निर्देश

सोमवारपासून पुणे शहराची पाणी कपात रद्द करण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे निर्देश

पुणे, दि.२९: खडकवासला प्रकल्प क्षेत्रात पुरेसा पाऊस झाल्याने आणि प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा झाल्याने पुणे शहरासाठी प्रत्येक आठवड्यात करण्यात येणारी पाणी कपात येत्या सोमवारपासून रद्द करण्याचे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.

यासंबंधाने शासकीय विश्रामगृह येथे आयोजित आढावा बैठकीस महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रसन्न जोशी, कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे, महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर आदी उपस्थित होते.

खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा २१.६२ टीएमसी असून गतवर्षी याच कालावधीत हा साठा २१.४२ टीएमसी होता. वर्षभरात पिण्याचे पाणी व शेतीसाठी साधारण ३० टीएमसी पाण्याची आवश्यकता असते अशी माहिती यावेळी देण्यात आली.

शेतीसाठी लागणारे पाणीही देण्यात यावे आणि धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेले तलावही भरण्यात यावेत. येत्या काळात पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन पुढील आढावा घेण्यात यावा असे निर्देशही श्री.पाटील यांनी दिले.