जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित निवडणूक साक्षरता मंचाच्या (ईएलसी) महाविद्यालय समन्वयक अधिकाऱ्यांच्या वार्षिक बैठकीत ते बोलत होते. कार्यक्रमाला उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे, वर्शिप अर्थ फाऊंडेशनचे तेजस गुजराथी, अल्ताफ पिरजादे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख पुढे म्हणाले, युवकांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढावा यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे. गतवर्षी ३८ महाविद्यालयात निवडणूक साक्षरता मंचाची स्थापना करुन चांगले काम करण्यात आले. यावर्षीही विशेष संक्षीप्त पुनरीक्षण मोहीम राबवताना विद्यार्थ्यांच्या मतदार नोंदणीसाठी महाविद्यालयांचा चांगला सहभाग अपेक्षित आहे. युवकांची मतदार नोंदणीतील उदासीनता दूर करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
पुढील वर्ष हे निवडणूक वर्ष असून लोकसभा, विधानसभा निवडणुकीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका या कालावधीत होणार आहेत. पूर्वीच्या तुलनेत आता निवडणूक प्रक्रियेत अमूलाग्र बदल झाला आहे. पूर्वी केवळ छापील मतदार यादी मिळायची तर आता तंत्रज्ञानातील बदलामुळे आपल्या मोबाईलवर मतदार यादी उपलब्ध आहे.
पायाभूत सुविधांमध्ये बदल होत असताना आता निष्पक्ष, मुक्त वातावरणात निवडणुका आयोजित करण्यासोबतच त्या अधिक सर्वसमावेशक आणि मतदार सहभागपूर्ण होतील याकडे भारत निवडणूक आयोगाद्वारे अधिक लक्ष दिले जात आहे. त्यातूनच तृतीयपंथी, देहविक्री व्यवसायातील महिला आदी दुर्लक्षित घटकांची मतदार नोंदणी करुन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे, असेही डॉ. देशमुख म्हणाले.
यावेळी श्रीमती कळसकर यांनी मतदार नोंदणी, वगळणी, नाव, तपशीलातील दुरुस्ती आदींबाबत तसेच नमुना ६, नमुना ७ तसेच नमुना ८ भरण्याविषयी सविस्तर माहिती दिली. निवडणूक साक्षरता मंचमध्ये स्वयंसेवक म्हणून काम करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सामाजिक कार्याचा त्यांना करिअर घडविताना फायदा होतो, असेही त्या म्हणाल्या.
उपजिल्हाधिकारी श्रीमती तांबे यांनी निवडणूक साक्षरता मंचाअंतर्गत पुढील काळात करण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. या अनुषंगाने लवकरच महाविद्यालयांसमवेत सामंजस्य करार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वर्शिप अर्थ फाऊंडेशनचे श्री. गुजराथी यांनी ईएलसी स्थापना, त्याबाबतचे सामंजस्य करार, विद्यार्थ्यांची इंटर्नशीप अंतर्गत निवड, मतदार जागृतीसाठी विविध स्पर्धा, उपक्रम तसेच निवडणूक साक्षरता मंडळांसाठीचे ॲप आदींबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
या बैठकीस ५२ महाविद्यालये, निवडणूक साक्षरता मंचाचे प्रतिनिधी, समन्वय अधिकारी, ६ महाविद्यालय विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.