बारामती लोकसभा मतदार संघाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे उपमुख्यमंत्री अजित पवार व ज्यांच्या नावाभोवती अख्ख्या महाराष्ट्राचे राजकारण चालते ते राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्याच बालेकिल्ल्यात भाजपाने कंबर कसली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बारामतीचा हा गड भाजप जिंकणारच यासाठी भाजपा प्रदेश स्तरावरील व तालुकास्तरावरील नेते मंडळी तयारीनिशी राजकीय मैदानात उतरले असल्याचे चित्र दिसत आहे.
दिनांक २४ मार्च रोजी भारतीय जनता युवा मोर्चा चे प्रदेश सचिव दीपक अण्णा काटे व भाजपाचे तालुकाध्यक्ष शरद जामदार व शहराध्यक्ष शकील भाई सय्यद यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते येत्या २६ मार्च रोजी बारामती लोकसभा मतदारसंघात ५२ शाखांचे उद्घाटन होणार असल्याचे जाहीर केले.
बारामती लोकसभा मतदार संघातील इंदापूर, बारामती तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्च्याच्या शाखांचे उदघाटन व जाहीर सभा असा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून या कार्यक्रमासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे, गोपीचंद पडळकर, आ. राम शिंदे,बाळा भेगडे,विक्रांत पाटील, मुरलीधर मोहोळ, राहुल लोणीकर, योगेश टिळेकर, हर्षवर्धन पाटील, नरेंद्र पाटील, गणेश भेगडे, या प्रमुख मान्यवरनेत्यांसाह स्थानिक पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहणार आहेत. शाखा उदघाटणाचा पहिल्या टप्यात इंदापूर तालुक्यातील युवा मोर्चा व युवा वॉरियर्स च्या शाखांचे ओपनिंग करण्यात येणार असून…. दुसऱ्या टप्यात बारामती व कर्जत जामखेड येथील शाखांचे ही उदघाटन करण्यात येणार आहे. अशी माहिती युवा मोर्चाचे प्रदेश सचिव दीपक आण्णा काटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दि. २६ मार्च रोजी बावनकुळे यांचे सायंकाळी पाच वाजता इंदापूर येथे आगमन होईल व तेथून त्यांच्या हस्ते इंदापूर शहरातील २ शाखांचे प्रतिनिधीक स्वरूपात उदघाटन होईल व त्यानंतर इंदापूर नगरपरिषदेसमोरील मैदानावर जाहीर सभा होणारं असल्याची माहिती ऍड. शरद जामदार व पदाधिकाऱ्यांनी दिली….