*असामान्यतेच्या मार्गावरील धोक्याचे वळण*

आपल्या आयुष्यातील कोणतीही निर्मिती, आपण गरजेपोटी निर्माण करत असतो. त्यामुळे गरजेनुसार त्या निर्मितीचा आकार आणि व्याप्ती असते. बहुतेक संसारी माणसे याच्या पलीकडे काही निर्माण करण्याची शक्यता नसते कारण त्यांना तशी इच्छाही निर्माण होत नाही आणि बुद्धीही निर्माण होत नाही.
आपल्या वैयक्तिक स्वार्थाच्या पलीकडे जाऊन, ज्यावेळी जगाच्या कल्याणासाठी आपली बुद्धी विचार करू लागते, त्यावेळी आपल्या हातून जी निर्मिती होते, ती आपण जीव ओतून केलेली असते.
*आत्मानुभव आल्याशिवाय माणूस अपूर्ण आहे.*
त्यामुळे अशा निर्मितीच्या वेळी आपण स्वतः अपूर्ण असलो, तर आपल्या निर्मितीमध्ये ते अपुर्णत्व डोकावत असते. समाज हा परीक्षकाची आणि समीक्षकाची भूमिका नेहमी बजावत असतो. *स्वतः काहीच न करणारी माणसे दुसऱ्याच्या कृतीला सतत वेगवेगळ्या दृष्टिकोनातून तपासत असतात.* व्यक्ती तितक्या प्रकृती असल्यामुळे, सगळ्यांच्या दृष्टिकोनातून पात्र होणारी कृती निर्माण होणे, महाकठीण असते.
आपण कितीही आणि काहीही चांगले करा, त्यात दोष शोधणारे समाजात अनेक असतात. साधू आणि संत ज्यांना प्रत्येक धर्मात सर्वोच्च स्थान आहे, त्यांना पावित्र्याची आणि शुद्धतेची सर्वोच्च पातळी म्हणून पाहिले जाते. अशा साधु आणि संतांच्या निर्मितीमध्ये सुद्धा दोष शोधणारे लोक आहेत.
प्रभू रामचंद्राच्या, आचरणाचा सर्वोच्च आदर्श असलेल्या चरित्रामध्ये सुद्धा समाजाने दोष शोधलेले आहेत. भगवान श्रीकृष्ण सारख्या अमर्याद पुरुषोत्तमाने धर्मराजाच्या हस्ते स्थापन केलेल्या धर्माधिष्ठित राज्यावर सुद्धा बोट ठेवणारे लोक होते.
*तुझा निर्वंश होईल !*
असा शाप गांधारीकडून भगवान श्रीकृष्णांनासुद्धा धर्मस्थापनेच्या मोबदल्यात मिळालेला आहे.
छत्रपती शिवाजी राजांच्या स्वराज्य निर्मितीला विरोध करणारे आप्तस्वकीय त्याही काळात होते. जगातील सर्व महामानवांना आणि महामातांना जगाच्या समीक्षेतून उत्तीर्ण व्हावे लागलेले आहे, आपल्यालाही हे चुकणार नाही.
कधीकधी अतिशय पवित्र विचार करून, एखादी निर्मिती आपण करत असतो, त्यावेळी अशा समाजातील समीक्षकांनी त्यातील दोष आणि चुका शोधून दाखविल्या, तर आपले मन नाराज होते. आपण एवढा जीव ओतून ही कृती केली, त्यात माझा कोणताही स्वार्थ नाही, केवळ परोपकाराच्या हेतूने आपण हे केले आणि याचा त्रास जर मला होत असेल, तर माझे या पासून काय नडले आहे ? असा विचार मनात सुरू होतो आणि आपण मनापासून ठरवलेली समाजसेवा, लोककल्याणकारी कार्य, निस्वार्थी कृती, यापासून आपण परावृत्त होतो आणि असामान्यतेच्या वाटेवर टाकलेले पाऊल, आपोआप सामान्यतेच्या मार्गावर चालू लागते. आपल्या जीवनातील ही अधोगती असते.
*आयुष्यातील हे वळण अतिशय संवेदनशील असते, अशा वळणावर आपला विवेक जागा असावा लागतो, आपला निश्चय दूढ असावा लागतो आणि आपला आपल्या स्वतःवर आणि आपल्या कृतीवर प्रचंड विश्वास असावा लागतो.*
तरच आपल्या हातून चांगले काम, असामान्य कृती आणि कर्तुत्व घडू शकते.
*चालू जाणे वाट ऐसा विरळा एखादा l आवश्यक तो सेवक येर वावगी खटपट ll*
डॉ. आसबे ल.म.
अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार.
मो.नं.9822292713.
