निर्मल गंगाजल पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी*
ज्यांचे पुण्यशील चरित्र लिहिले,वाचले , सांगितले, ऐकले असता आपल्याला पुण्य प्राप्त होते,त्यांना *पुण्यश्लोक* ही उपाधी लावली जाते.
*दृढ निश्चयी आणि आढळ*
लहान वयात सीना नदीच्या काठी वाळूचे शिवलिंग तयार केले, पेशव्यांचा उधळलेला घोडा त्यादिशेने आला असता, सर्व मैत्रिणी पळून गेल्या, परंतु देवीने शिवलिंगावर स्वतःला झोकून देऊन शिवलिंग वाचवले, जीवाचीही पर्वा केली नाही. पेशव्यांनी असे का केले ? असे विचारले, तर *”आपणच निर्माण केलेले शिवलिंग, आपण स्वतः प्राणपणाने रक्षिले पाहिजे !”* असे बाणेदार उत्तर दिले. या बाणेदार उत्तराने चौंडीच्या माणकोजी शिंदे यांची खेड्यातील मुलगी सुभेदार मल्हारराव होळकर यांची सून झाली.
मल्हारराव होळकरांनी आपल्या सुनेचे अलौकिक गुण ओळखून आपल्या संस्थानाचा सर्व कारभार मातेच्या हाती दिला. खंडेराव होळकर त्या संस्थानाचे अधिकृत युवराज असूनही, त्यांनी आगाऊ मागितलेला पगार अहिल्याबाईंनी स्पष्ट नाकारला. हे धाडस इतिहासात कोणत्याच स्त्रीच्या नावावर नाही.
स्वतः महाराणी असून, आपल्या मुक्ता नावाच्या मुलीचे स्वयंवर करण्याचा निर्णय अतिशय विचारपूर्वक आणि निर्धाराने घेतला. सासरे मल्हारराव होळकर आणि सासू गौतमीबाई यांनी ज्यावेळेला प्रश्न केला, जर स्वयंवर जिंकणारा आपल्या जातीतला नसला, तर काय करणार ? त्यावेळी अहिल्यादेवींनी उत्तर दिले, *”वीराला आणि शूराला जात नसते , आपण त्यांच्या गुणांकडे पाहिले पाहिजे, जातीकडे नाही !”* आपल्या निश्चयाशी ठाम राहिल्या आणि इतिहासातील पुराणा नंतरचे पहिले स्वयंवर करण्याचा बहुमान त्यांच्या नावावर लिहिला गेला.
खंडेराव होळकरांचे सहामासी श्राद्ध करत असताना, खंडेराव होळकरांबरोबर सती गेलेल्या सात राण्यांना पिंडदान केले गेले, परंतु त्यांच्याबरोबर सती गेलेल्या दोन कंचनी स्त्रिया, ज्या मुस्लीम होत्या, शबनम आणि शकीना, त्यांना मुस्लिम असल्यामुळे पिंडदान करण्याचे पुरोहितांनी नाकारले. त्यावेळी अहिल्यामातेने श्राध्द विधी थांबवला आणि शास्त्रींना, *त्या दोन मुस्लिम स्त्रियांनाही पिंडदान करण्यास भाग पाडले.*
हा त्यांचा पुरोगामी विचार त्यावेळी त्यांच्याबरोबर असलेल्या त्यांच्या दोन भावांना शहाजी आणि महादजी शिंदे यांना पटला नाही. वर्ष श्रद्धाचे वेळी, त्यांनी पत्र लिहून कळवले की पुन्हा त्या मुस्लिम स्त्रियांसाठी विधी करणार असाल, तर आम्ही त्या कार्यक्रमास येणार नाही, त्यामुळे आमची इज्जत गेली, ती करणार नसाल तरच आम्ही येतो. अहिल्यादेवींनी पत्र लिहून कळवले, *आपण याल तर आपला सन्मान होईल, परंतु ठरलेल्या कार्यक्रमात कोणताही बदल होणार नाही आणि आपण नाही आलात, तर आपल्या स्वभावाचा कोतेपणा उघड होईल.* अहिल्या मातेने वर्ष श्राद्ध विधीतही त्या मुस्लिम स्त्रियांसाठी सुद्धा पिंडदान केले.
*मुरब्बी आणि मुत्सद्दी रणरागिनी*
मल्हारराव आणि मालेराव होळकरांच्या मृत्यूनंतर, त्यांच्याच संस्थानात मुनीम असलेला गंगोबा चंद्रचूड, हा ब्राह्मण फितूर झाला आणि राघोबादादांना इंदोर हे संस्थान वारस नसल्यामुळे जप्त करण्याचा सल्ला दिला. राघोबादादा उज्जैनपर्यंत सैन्य घेऊन आले, त्यावेळी मातेने एक खलिता पाठवला त्यात उल्लेख केला. *क्षिप्रा नदी ओलांडाल, तर मी भाला घेऊन उभी आहे. युद्धामध्ये आपण जिंकला, तर एका स्त्रीला हरवल्यामुळे आपली नामुष्की होईल आणि युद्धात हारला तर एक बाईकडून हरला म्हणूनही आपली नामुष्कीच होईल. मी जिंकले किंवा हरले तरी लढवैयी विरांगणा म्हणून माझा लौकिकच वाढेल.* या पत्रातील अर्थपूर्ण शब्दाचा राघोबादादावर परिणाम झाला आणि *तलवारीपेक्षा मातेची लेखणी भारी ठरली आणि लेखणीने मातेने रक्ताचा एक थेंबही न सांडता युद्ध जिंकले.*
स्वतः रणांगणात उतरून चंद्रावतांचा पराभव दोनदा केला. मालेरावांच्या मृत्यूनंतर, तुकोजी होळकर यांना सुभेदाराची वस्त्रे दिली गेली. कालांतराने तुकोजी होळकर यांना राज्याची अभिलाषा निर्माण झाली. त्यावेळी त्यांनी महादजी शिंदे यांना मध्यस्थी करण्यासाठी मातेकडे पाठवले. त्यावेळी महादजी शिंदे, माता ऐकत नाही असे दिसताच दरडावण्याच्या भाषेत बोलले, “आम्ही पुरुष माणसे, आमच्या ढंगावर आलो, तर तुम्ही बाईमाणूस काय कराल ?” त्यावेळी रणरागिणी मातेने जे उत्तर दिले, ते इतिहासात अजरामर झालेले आहे. माता दृढनिश्चयाने बोलल्या *”तुम्ही सैन्यासह यावे, सीमेवर उभे राहून , हत्तीच्या पायाला मिठी मारून तुमचा हत्ती नाही परत फिरवला, तर मल्हाराची सून म्हणून नाव सांगणार नाही !”* या बाणेदार उत्तराने महादजी शिंदे वरमले आणि तेथून पुढे त्यांनी कायम मातेला मदतच केली, तुकोजी होळकरही तेथून पुढे त्यांच्या आज्ञेत राहिले.
राघोबादादांच्या प्रकरणानंतर गंगोबांनी संन्यास घेतला, पण मातेने त्यांना कनकाईच्या किल्ल्यात मरेपर्यंत नजरकैदेत ठेवले. संन्याशी झाले म्हणून त्यांना मारले नाही, परंतु नजरकैदेत ठेवले, हा त्यांचा धूर्त आणि मुत्सद्दी निर्णय होता.
*सासु गौतमीबाई आणि सासरे मल्हारराव*
इतिहासातील हे सासू-सासरे अतिशय अलौकिक आहेत. आपल्या हयातीत राज्याचा पूर्ण कारभार सुनेच्या हातात देणारे, ते इतिहासातील पहिले सासरे आहेत. खंडोजीराव होळकर यांना आगाऊ पैसे द्यायचे नाकारले, त्याबद्दल सासु गौतमीबाई आणि सासरे मल्हाराव यांनी अहिल्यादेवीचे कौतुकच केले.
खंडेरावांचा चितेवर नऊ स्त्रिया सती गेल्या, अहिल्या माता सती जाऊ लागल्या, त्यावेळी मल्हारराव होळकरांनी त्यांच्या पायावर डोके ठेवून, अहिल्यामातेला अडवले. *गेली ती अहिल्या, आता तूच माझा खंडेराव !* असे म्हणून विनवणी केली.
*सुनेच्या पायावर डोके ठेवणारा, इतिहासातील हा एकमेव सासरा आहे.*
मुक्ताच्या स्वयंवराच्या निर्णयाला सुभेदार असून, प्रतिष्ठित घराणे असूनसुद्धा, सूनेच्या पुरोगामी विचाराला पाठिंबा देणारे, हे सासू- सासरे एकमेवाद्वितीय आहेत.
*अहिल्या मातेच्या पुण्यश्लोक होण्याच्या प्रक्रियेत सासु गौतमीबाई आणि सासरे मल्हारराव होळकर यांचा सिंहाचा वाटा आहे.* त्यांचे योगदान विसरून अहिल्यादेवी कोणालाही सांगताच येणार नाहीत.
*लोक कल्याणकारी निर्णय*
हुंडा बंदी, सती प्रथा बंदी, वृक्ष लागवड, शेकडो विहीरी आणि तलाव बांधणे, नदीवरती घाट बांधणे, अन्नछत्र उघडणे, शिक्षण व्यवस्था, सर्व प्रकारच्या कलाकारांना माहेश्वरी संस्थांमध्ये घरे बांधून देऊन, त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था करणे, काशी पासून रामेश्वर पर्यंत शिवमंदिराचा जीर्णोद्धार आणि बांधकाम करणे, चोर आणि दरोडे करणारे भिल्ल, यांना सैन्यदलात घेऊन, त्यांना रोजगार उपलब्ध करून देऊन, सन्मार्गाला लावणे, पेशव्यांनाही हेवा वाटेल असा तोफांचा कारखाना उभा करणे. एका विधवा स्त्रिने केलेल्या कार्याचा हा डोंगर आहे.
*लोकप्रियतेच्या शिरोमणी*
लोककल्याणकारी योजना आणि सत्वशील व धार्मिक आचरण यामुळे माता अतिशय लोकप्रिय झालेल्या होत्या, आजही आहेत आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्यांची लोकप्रियता अबाधित राहणार.
अनंत फंदी नावाचा एक लोकशाहीर, तमाशा मध्ये कवने लिहीत असायचा. त्याने मातेवर कविता लिहिल्या आणि दरबारात त्यांना ऐकून दाखविल्या, त्यावेळी मातेने त्यांना उपदेश केला, व्यक्तीची स्तुती करण्याऐवजी तुम्ही तुमची प्रतिभा भगवंत चिंतनासाठी वापरा, त्यात तुमचे कल्याण होईल ! *या उपदेशाने एक तमाशात काम करणारा कलावंत, पुढे प्रख्यात कीर्तनकार झाला आणि संतपदाला पोहोचला.*
अहिल्यामाता आजारी असताना सर्व लोक माहेश्वरी संस्थांच्या राजवाड्यात त्यांना भेटायला येऊ लागले. त्यात एका भिल्लाने आपल्या हातातील जंबियाने ( चाकू ) आपल्या पोटात खुपसून घेतला आणि देवाला विनंती केली, *माझे उरलेले आयुष्य माझ्या आईला दे !* एखाद्या व्यक्तीसाठी स्वतःचा जीव देऊन उरलेले आयुष्य दान करण्याची भगवंताकडे प्रार्थना करणारा *हा प्रसंग इतिहासात अहिल्यादेवी सोडून कोणाच्याही वाट्याला आलेला नाही*
अहिल्यामातेने प्राण सोडताच , ज्या गायीला त्या नीत्य नैवेद्य देत असायच्या त्या गायीने डोके आपटून आपलाही प्राण सोडला.
वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी वैधव्य येऊन, रक्ताच्या नात्यातील बावीस माणसे डोळ्यासमोर जाऊन, नियतीने पूर्णपणे जीवनात एकलेपणा देऊन, जीवनात सर्वोच्च दुःखांना खंबीरपणे तोंड देऊन, ४४ वर्षे राजमाता म्हणून अलौकिक लोक कल्याणकारी राज्य करणाऱ्या, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत प्रत्येक स्त्रीला मार्गदर्शक आणि आदर्श ठरणाऱ्या, आपल्या कर्तुत्वाने आणि सामर्थ्याने, *निर्मल गंगाजल पुण्यश्लोक ठरलेल्या त्या जगाच्या पाठीवरील एकमेव राजमाता देवी आहेत.*
या दिव्य मातेच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चरणावर
*त्रिवार मानाचा मुजरा !*
डॉ. आसबे ल.म.
अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार.
मो.नं.9822292713.
