पुणे, दि. १०: महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जी-२० शैक्षणिक कार्यगटाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ‘पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान’ या विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन आझम कॅम्पस, पुणे येथील सभागृहात करण्यात आले.

कार्यशाळेस राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक शरद गोसावी, माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालक शिक्षण मंडळाचे संचालक संपत सूर्यवंशी, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, आझम कॅम्पसचे कुलपती पी. ए. इनामदार, डॉ. आबेदा इनामदार, शिक्षण विभागाचे सहसंचालक श्रीराम पानझडे, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे सहसंचालक रमाकांत काठमोरे, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे उपसंचालक डॉ. नेहा बेलसरे, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे डॉ. वैशाली वीर, डॉ. कमलादेवी आवटे आदी उपस्थित होते.

प्रस्ताविकात डॉ. नेहा बेलसरे यांनी जी-२० शैक्षणिक कार्यगटाबाबत माहिती दिली. पायाभूत शिक्षणाचा टप्पा मजबूत करण्यासाठी गुणवत्तापूर्ण बाल शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करणे व वय वर्ष ९ पर्यंत प्रत्येक बालकाला पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त होईल याची सुनिश्चिती करून ही प्रक्रिया नवीन राष्ट्रिय शैक्षणिक धोरण -२०२० च्या पार्श्वभूमीवर गतिमान करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
.
कार्यशाळेत पायाभूत राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा आणि जादुई पिसारा यावर मार्गदर्शन करण्यात आले. पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान उपक्रमाच्या अनुषंगाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद अंतर्गत चालणाऱ्या विविध उपक्रमाची माहितीदेखील यावेळी देण्यात आली. सहभागी प्रतिनिधींनी त्यांच्या कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती सांगितली.

सामाजिक संस्था, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व जिल्हा परिषदच्या माध्यमातून कार्यशाळेच्या परिसरात विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. एकूण सात कक्षांच्या माध्यमातून बालकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठीच्या घटकांचे सादरीकरण करण्यात आले.

यावेळी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, प्राचार्य डाएट, शिक्षणाधिकारी, महिला व बालविकास, समाजकल्याण विभाग, आदिवासी विकास विभाग, शालेय शिक्षण विभागातील राज्यस्तर अधिकारी, शिक्षक आदी उपस्थित होते.
***

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!