पुणे, दि. १८: पुणे- अहमदनगर महामार्गावरील वाढलेल्या रहदारीमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी खराडी चौक ते शिरुर घोडनदी पूल या मार्गावर विविध उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी यंत्रणांना दिले आहेत.

पुणे- अहमदनगर महामार्ग हा पुणे जिल्ह्यास अहमदनगर व मराठवाडा तसेच विदर्भातील इतर जिल्ह्यांना जोडणारा प्रमुख महामार्ग आहे. या रस्त्याची क्षमता ४० हजार वाहने (पॅसेंजर कार युनिट- पीसीयु) इतकी असताना प्रत्यक्षात ७५ हजार वाहने दररोज धावतात. त्यामुळे अपघातांचे प्रमाणे वाढले असून नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.

यावर उपाययोजना सुचविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष डॉ. देशमुख यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांना महामार्गाची संयुक्त पाहणी करण्याचे निर्देश दिले होते. संयुक्त पाहणीनंतर सुचविण्यात आलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी तात्काळ करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

त्यानुसार वाघेश्वर पार्किंग येथे वाहतूक नियंत्रण सिग्नल बसविणे, वाघेश्वर मंदिर ते वाहनतळ चौक दरम्यान रस्ते दुभाजकांना रंग लावणे, रिफ्लेक्टर, कॅटआय, रेलींग बसवणे, रस्त्यांवर पट्‌टे मारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पदपथापरील अतिक्रमणे हटवणे, अनाधिकृत फेरीवाले, टपरीवाले, फळविक्रेत्यांना मज्जाव करण्यात यावा असे नमूद करण्यात आले आहे. वाघोली चौकात प्रवासी बसेसना रस्त्यावर थांबण्यास मज्जाव करुन त्यांच्यासाठी सुयोग्य बसथांबा उपलब्ध करुन द्यावा अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

बीजेएस चौक, वन स्टॉप फर्निचर मॉल, सोमेश्वर पार्क फ्लॅश आपले घर, आय व्ही इस्टेट, केसनंद फाटा येथे विकफिल्ड कंपनी व जगताप डेअरी येथील महामार्गाचे वळण व उतार, केसनंद फाटा चौक, थेऊर फाटा, पुरेा फाटा, कोरेगाव भीमा, सणसवाडी चौक, शिक्रापूर, चाकण चौक, वेळू नदीवरील पूल, कोंढापुरी, रांजणगाव गणपती मंदीर, राजमुद्रा चौक, यश ईन चौक, शिरुर बायपास चौक आदी ठिकाणी विविध उपाययोजना कराव्यात असे स्पष्ट करण्यात आले आहे.

पदपथावरील, रस्त्यावरील अतिक्रमणे हटविणे, आवश्यक तेथे ट्रॅफिक सिग्नल्स बसविणे, दिशादर्शक फलक व नो पार्किंग सूचनाफलक बसवणे, दुभाजकांची दुरुस्ती, अनावश्यक छेद दुभाजक बंद करणे, ब्लिंकर्स, वाहनांचा वेग कमी करण्यासाठी रंबलर्स बसविणे, पादचाऱ्यांसाठी रस्ता क्रॉसिंग, झेब्रा क्रॉसिंगची व्यवस्था करणे, गतिरोधक बसविणे, उच्च प्रकाशव्यवस्थेसाठी दिवे बसविणे आदी उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभाग, महामार्ग पोलीस, परिवहन विभाग, महावितरण, पीएमपीएमएल, पीएमआरडीए, एमआयडीसी, संबंधित ग्रामपंचायती आदी सर्वांनाच याअनुषंगाने उपाययोजना करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत.

या महामार्गावर वाहनांच्या वेगाचे संनियंत्रण करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी स्पीडगन बसविण्यात येणार आहेत. प्रमुख गावातून जाणाऱ्या रस्त्यांवरील दुभाजकांवर रेलिंग बसविण्यात येणार आहेत. पोलीस विभागाने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे प्रमाण वाढवावे, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

*अपघातमुक्त महामार्गासाठी नागरिकांच्या सूचनांचे स्वागत*
हा महामार्ग अपघातमुक्त करण्यासाठी नागरिकांच्या सूचनांचाही गांभिर्याने विचार करण्यात येईल असे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले असून नागरिकांनी आपल्या सूचना rto.12-mh@gov.in या ई-मेलवर पाठवाव्यात असे आवाहन त्यांनी केले आहे.

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!