img 20230511 wa0044
पुणे दि.११: श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावीत आणि निर्मल व हरित वारीसोबत हा सोहळा वारकऱ्यांसाठी आनंददायी होईल यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असे निर्देश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात आषाढी एकादशी यात्रा पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, कोल्हापूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पुण्याचे सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, सातारा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, विभागीय आयुक्तालयाच्या उपायुक्त वर्षा लड्डा आदी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त श्री. राव म्हणाले, राज्यभरातून आलेल्या वारकऱ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. निर्मल आणि हरित वारीवर भर देऊन त्यासाठी सेवाभावी संस्थांची मदत घेण्यात येत आहे. जी-२० बैठकीसाठी १५० पेक्षा अधिक प्रतिनिधी यादरम्यान पुण्यात मुक्कामाला असणार आहेत. या प्रतिनिधींना राज्याच्या या समृद्ध सांस्कृतिक परंपरेची माहिती देण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने पालखी मार्गावरील रस्त्यांची आवश्यक दुरुस्ती करावी. जिल्हा परिषदांनी शौचालयाची सातत्याने स्वच्छता होईल याकडे विशेष लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले.

पालखी सोहळा नियोजनासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर बैठका घेण्यात आल्याचे सांगून श्री.राव म्हणाले, पालखी मार्ग आणि पालखी तळावरील विविध सुविधांसाठी आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. रस्ते दुरुस्ती, सपाटीकरण, अतिक्रमण काढणे, वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांबाबतही आवश्यक कार्यवाही करण्यात आली आहे. पुणे जिल्हा प्रशासनाने वारीच्या नियोजनाची माहिती देण्यासाठी मोबाईल ॲप चा उपयोग करावा, अशी सूचना त्यांनी दिली. वारकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

मनपा आयुक्त श्री.सिंह म्हणाले, सोहळ्यासाठी समन्वयक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पालखी तळावरील स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. मुक्कामाच्या ठिकाणी सीसीटीव्ही, ६९२ तात्पुरती शौचालये आणि ५८ तात्पुरत्या स्नानगृहांची सुविधा करण्यात आली आहे. पालखीच्या स्वागताची तयारीदेखील करण्यात आली आहे.

श्री.फुलारी म्हणाले, पालखी सोहळ्यासोबत वायरलेस यंत्रणा उपलब्ध करून देण्यात येईल. बंदोबस्तासाठी अनुभवी पोलीस अधिकारी नेमण्यात येतील. स्थानिक पोलीस प्रशासनाशी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हाधिकारी श्री. जयवंशी म्हणाले, नीरा नदीवरील पुलाच्या दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे. पालखी मार्गावर मदत केंद्र उभारण्यात येत आहे. पालखी तळावरील आवश्यक सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे. पालखी मार्गावरील रस्ते दुरुस्ती आणि स्वच्छता तसेच आरोग्य सुविधांबाबत नियोजन करण्यात आले आहे.

सोलापूरचे अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे म्हणाले, पालख्याच्या मुक्काम आणि रिंगणाच्या ठिकाणी आवश्यक सुविधा करण्यात आली आहे. घटना प्रतिसाद प्रणाली कार्यरत करण्यात आली असून ३१ आपत्ती प्रतिसाद केंद्र उभारण्यात येणार आहे. नियोजनासाठी ९ स्वयंसेवी व सामाजिक संस्थांचे १ हजार ९०० स्वयंसेवक मदतीला असतील. संपूर्ण सोहळ्यादरम्यान २५ हजार ५०० अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहे. या सर्वांना यशदा मार्फत प्रशिक्षण देण्यात येईल.

आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक साधनसामग्री तयार ठेवण्यात आली आहे. पाणी पुरवठ्यासाठी ४९ टँकर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पालखी मार्गावर गॅस वितरणासाठी ३० ठिकाणी व्यवस्था करण्यात आली असून २६ हजार शौचालयांची व्यवस्था करण्यात येईल. दर्शन रांगेचे नियोजन आणि लाईव्ह दर्शनाची व्यवस्था करण्यात येणार आहे, वारकऱ्यांच्या निवासासाठी ६५ एकर क्षेत्रात नियोजन करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

निवासी उप जिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी पुणे जिल्ह्यातील पूर्वतयारीची माहिती दिली. त्या म्हणाल्या, पालखी तळावर आवश्यक सुविधा करण्यात येत आहे. पालखी मार्गावर अतिरिक्त मोबाईल टॉवर उभारण्यात येत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पालखी तळ, विसाव्याची ठिकाणे आदी ठिकाणी भेट देऊन आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. संपूर्ण पालखी सोहळ्यादरम्यान आवश्यक आरोग्य सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येतील.

मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, यावर्षी २ हजार ७०० तात्पुरत्या शौचालयाची व्यवस्था करण्यात येणार आहे. स्वच्छतेसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती असेल. वैद्यकीय उपचारासाठी रुग्णवाहिका, मोटार सायकलवर आरोग्यदूतांची नेमणूक आणि पुरेशा प्रमाणात वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात येतील. पिण्याच्या पाण्याचे ७० टँकर उपलब्ध करून देण्यात येतील. निर्मल वारीसाठी आवश्यक उपाय केले जातील असे त्यांनी सांगितले.

बैठकीस पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, पालखी सोहळ्याचे प्रमुख पदाधिकारी, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!