ईर्षा.
*ईर्षा……*
एकदा ब्रह्मदेव रथातून जात असताना सारथी अचानक रथ थांबवतो. ब्रह्मदेवाने कारण विचारले असता तो सांगतो की एक छोटा प्राणी बसला आहे तो रस्त्यातून बाजूला होत नाही म्हणून रथ थांबवावा लागला
त्याला बाजूला होण्याची विनंती कर. थोड्या वेळाने ब्रह्मदेवाने पुन्हा विचारल्यावर सारथ्याने सांगितले की तो प्राणी पूर्वी होता त्यापेक्षा मोठा झाला आहे.
ब्रह्मदेवाने सांगितले की त्याला चाबूक दाखव म्हणजे तो बाजूला जाईल.
ब्रह्मदेवाने पुन्हा विचारल्यावर कळले की तो प्राणी अधिकच मोठा झाला आहे. आता तो प्राणी तर एका डोंगराएवढा मोठा झाला आहे आणि रथावर चाल करून येत आहे. हे ऐकताच ब्रह्मदेव म्हणाले रथ मागे घे आणि त्याला सांग की, *’तूच श्रेष्ठ आहेस, आम्ही रथ वळवतो आणि दुसऱ्या मार्गाने जातो’.* सारथ्याने हे सांगितल्यावर तो प्राणी एकदम मुंगी इतका छोटा झाला आणि रस्त्यातून बाजूला झाला. आश्चर्यचकित झालेल्या सारथ्याने ब्रह्मदेवास याचे कारण विचारता देवाने सांगितले की ‘त्या प्राण्याचे नाव इर्षा असे होते. आपण जेवढे महत्व त्याला देऊ तेवढा तो मोठा होत जाईल. मात्र आपण स्पर्धेतून दूर झाल्यावर इर्षा राहिली नाही आणि तो सामान्य स्वरुपात आला.’
सर्वच स्पर्धा ह्या जिंकण्यासाठी खेळायच्या नसतात. काहीवेळा फालतू स्पर्धेत भाग घेतल्यामुळे उगाच उर्जा व्यर्थ खर्च होते. काहीवेळा नमते घेतल्यामुळे फायदाच होतो. याचप्रमाणे जग लोकाच्या नजरेने बघण्यापेक्षा आपल्या नजरेने बघावे. आपण सुखी आहोत याची पावती लोकांकडून घेण्यापेक्षा आपले सुख आपणच अनुभवावे.
आपला निर्णय आपण घ्यावा आणि त्यास जबाबदार राहावे … लोकं काय म्हणतील याचा फार विचार करू नये कारण एक न एक दिवस जेव्हा चितेवर पडलो असू तेव्हा एका प्रमाणापेक्षा कोणीही आपल्याला जवळ करणार नाही तेव्हा आपले सुख दुःख आपणच अनुभवावे….. आयुष्य तणावमुक्त होते.
यालाच वास्तव जीवन जगण्याची कला म्हणतात.