देवरूख:-संगमेश्वर तालुक्यातील आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टीमने स्मार्ट इंडिया हॅकेथॉन या स्पर्धेमध्ये सुयश संपादन केले आहे. ११ डिसेंबर ते १५ डिसेंबर २०२४ दरम्यान हरियाणातील पानिपत येथे आयोजित स्पर्धेच्या ग्रँड फिनालेमध्ये महाविद्यालयाच्या टीमने उपविजेतेपद पटकाविले आहे.*
*👉🟥🟥👉विविध क्षेत्रातील विकास आणि उद्योजकता किंवा दैनंदिन जीवनातील समस्यांना यशस्वीपणे तोंड देता यावे यासाठी देशपातळीवर प्रयत्न चालू असतात. त्याचाच एक भाग म्हणून सदर समस्यांचे निराकरण करता येईल, अशा नवीन संकल्पना व तंत्रज्ञान याचा शोध घेण्यासाठी शिक्षण मंत्रालय, भारत सरकार आणि ए.आय.सी.टी.ई. यांच्या संयुक्त विद्यमाने स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन या स्पर्धेचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. स्पर्धेसाठी तंत्रज्ञान क्षेत्रातील विद्यार्थ्यांना विविध विषय दिले जातात व त्यातील समस्यांवरील विविध उपायांचा यातून शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात येतो. त्यातून विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला व ज्ञानाला वाव मिळावा व त्यातून देशातील विविध समस्यांवरील नवीन उपाय मिळावेत, हा या स्पर्धेचा मुख्य हेतू असतो. यावर्षी भारतभरातील ५ लाख नोंदणीकृत विद्यार्थी आणि ३ लाख नामांकित उमेदवारांपैकी फक्त ११८ संघ स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०२४ च्या पहिल्या फेरीत पोहोचले.*
*👉🔴🔴👉जलशक्ती मंत्रालयाने दिलेल्या “ग्रे वॉटर वेस्ट मॅनेजमेंट” या गंभीर समस्या विधानासाठी उपाय सादर करण्यासाठी ग्रँड फिनालेसाठी सर्वोत्तम ५ संघांची निवड करण्यात आली. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नद्या आणि तलावांमध्ये सोडण्यापूर्वी पाणी दूषित होण्यापासून रोखण्यासाठी कमी किंमतीची तांत्रिक प्रणाली विकसित केली असून ती यावेळी सादर केली. यामध्ये बायोमिमिक्री-आधारित दृष्टिकोनात सेटलिंग चेंबर, पर्कोलेशन चेंबर, बायो-फिल्टर चेंबर आणि वायुवीजन चेंबरसह बहु-स्तरीय शुद्धीकरण प्रणालीचा समावेश असून ऑक्सिजन मिश्रण वाढविण्यासाठी, जलचरांना कमीत कमी हानी सुनिश्चित करण्यासाठी आणि शेतीसाठी पाण्याचा पुनर्वापर करण्यास सक्षम करण्यासाठी कारंजे वापरून एक नाविन्यपूर्ण वायुवीजन यंत्रणा प्रस्तावित करण्यात आली.*
*👉🟥🟥👉या यंत्रणेला भारतातील सर्वोत्तम 5 नवोपक्रमांपैकी एक म्हणून मान्यता मिळाली आहे. महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर विभागातील सुजल सावर्डेकर, सुबोध मुनेश्वर, उदय सावंत, विशालिनी अंकम, सिद्धेश गुरव, आणि प्रांजल सावंत या विद्यार्थ्यांचा टीममध्ये समावेश होता. महाविद्यालयाच्या टीमला उपविजेतेपद घोषित करून मान्यवरांच्या हस्ते करंडक व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेचे संस्थापक व माजी राज्यमंत्री मा. रविंद्रजी माने, कार्यकारी अध्यक्षा सौ. नेहा माने, उपाध्यक्ष मनोहर सुर्वे, प्राचार्य डॉ. महेश भागवत तसेच महाविद्यालयाच्या सर्व विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक यांनी सर्वांचे अभिनंदन केले व शाश्वत भविष्यासाठी योगदान दिल्याबद्दल अभिमान व्यक्त केला.