पुणे, दि. ११: इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने मुला-मुलींसाठी उभारण्यात आलेल्या राज्यातील ४४ वसतिगृहांचा दूरदृष्य प्रणालीद्वारे लोकार्पण सोहळा बुधवारी (९ ऑक्टोबर) संपन्न झाला.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृष्यप्रणालीद्वारे हा सोहळा आयोजित करण्यात आला. पुणे येथे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्यावतीने मुला-मुलींसाठी उभारण्यात आलेल्या वसतिगृहांचा उद्घाटन सोहळा टी.एस.एस.एम भिवराबाई सावंत अभियांत्रिकी महाविद्यालय नऱ्हे येथे पार पडला. या सोहळ्यास विभागाचे प्रादेशिक उपसंचालक खुशाल गायकवाड, इतर बहुजन कल्याण पुणेचे सहाय्यक संचालक विशाल लोंढे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश हिंगे आदी उपस्थित होते.
या घटकातील व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी १०० विद्यार्थी क्षमतेचे मुलांसाठी एक व मुलींसाठी एक याप्रमाणे शासकीय वसतिगृहे सुरु करण्यासाठी शासनामार्फत मान्यता देण्यात आलेली आहे. याअंतर्गत नऱ्हे येथे वसतिगृह सुरू करण्यात आले असून येथे १०० मुलांना प्रवेश दिला जाणार आहे. तसेच १०० मुलींच्या क्षमतेचे वसतिगृहदेखील लवकरच सुरू करण्यात येणार आहे, असे श्री. लोंढे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.