अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणाविरोधी कायद्याची अंमलबजावणी होणार*!
*पुण्यात ६ मे रोजी राज्यस्तरीय कार्यशाळाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन*
————————————–
पुणे दि.४- महाराष्ट्र शासनाने अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायदा पारित केला असून या कायद्याच्या प्रचार, प्रसिद्धी व अंमलबजावणीसाठी राज्याच्या समाज कल्याण विभागाने पुढाकार घेतला आहे. विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी ६ मे रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून सामाजिक न्याय विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते सकाळी ११:३० वाजता या कार्यशाळेचे उद्घाटन होणार आहे.
यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायदा प्रचार प्रसिद्धी समितीचे सहअध्यक्ष श्याम मानव मार्गदर्शन करणार आहेत. समाज कल्याण विभागाचे सचिव सुमंत भांगे व आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे हे यावेळी उपस्थित राहतील.
महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ शासनाने पारित केला आहे. त्याअंतर्गत विविध समित्या शासनाने गठीत केल्या असून कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रचार प्रसिद्धी समिती गठित करण्यात आली आहे. या समितीच्यावतीने समाज कल्याण विभागातील संपूर्ण राज्यात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी एक दिवसाची कार्यशाळा पुणे येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी यांनी दिली आहे. पुणे येरवडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे सकाळी ११:३० ते सायंकाळी ४:३० वाजेपर्यंत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
