‘मराठी माणूस आपल्या विचारांनी पुन्हा दिल्ली जिंकणार’
‘आगामी शंभरावे संमेलन भव्यदिव्य स्वरूपात साजरे करणार’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उदघाटन पार पडले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर, हे पहिले संमेलन राजधानी दिल्लीत होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगभरातील मराठी माणसांच्या मनात असलेले मराठी भाषेला अभिजात भाषेच्या दर्जाचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे याप्रसंगी आभार मानले. तसेच परकीय आक्रमणामुळे मराठी भाषेची जी हानी झाली, त्याला छत्रपती शिवाजी महाराज यांनी दुरुस्त करून, मराठीला राजभाषा म्हणून स्थापित केले. स्वभाषेचा आग्रह व स्वभाषेचा अभिमान आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांनीच शिकविला, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ज्या तालकटोरा स्टेडियममध्ये संमेलनाचे सर्व कार्यक्रम संपन्न होणार आहेत त्याच ठिकाणी 1737 मध्ये राणोजी शिंदे, सरदार मल्हारराव होळकर व थोरल्या बाजीरावांनी मराठ्यांची छावणी लावत दिल्ली जिंकली होती. मराठी माणसाच्या ठायी कला, साहित्य व संस्कृती वसलेली आहे आणि आता आपल्या विचारांनी या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मराठी माणूस पुन्हा एकदा दिल्ली जिंकणार आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
शंभरापेक्षा अधिक बोलीभाषा मराठीत आहेत. सर्व प्रकारच्या विचारांना, बोलीभाषांना मराठीच्या साहित्य संमेलनात स्थान मिळते. वारकरी परंपरेतील संतांसमवेत अनेक साहित्यिकांनी मराठीला व तिच्या बोलीभाषांना समृद्ध केले आहे, अशा आपल्या मायमराठीची सेवा करण्याची संधी या संमेलनाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना मिळत असल्याचे, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी मराठी साहित्य महामंडळ, संमेलनाच्या अध्यक्षा, निमंत्रक यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष खा. शरद पवार, संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे व उपाध्यक्ष गुरय्या स्वामी, संमेलनाचे निमंत्रक संजय नहार, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, मराठी साहित्य क्षेत्र व इतर क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.