विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती;
अध्यक्षपद भूषवणाऱ्या ठरल्या पहिल्याच मराठी व्यक्ती
*नवी दिल्ली:-भाजपच्या राष्ट्रीय सचिव, राजस्थानच्या सह प्रभारी श्रीमती विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. विजया रहाटकर यांनी महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणूनही आपला ठसा उमटवला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने त्यांची नियुक्ती केली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या त्या पहिल्या मराठी व्यक्ती ठरल्या आहेत.*
*👉🔴🔴👉त्यांना केंद्रीय राज्यमंत्री पदाचा दर्जा असेल. संवैधानिक दर्जा असणाऱ्या राष्ट्रीय महिला आयोगाला अत्यंत व्यापक अधिकार आहेत. महिलांच्या उन्नतीसाठी घटनात्मक आणि कायदेशीर मुद्दांचा फेरआढावा घेणे, संसदीय- वैधानिक शिफारशी करणे, महिलांविषयक धोरणात्मक बाबींसाठी केंद्र व राज्य सरकारांना सल्ला देणे, महिलांविषयक प्रश्नांचा संशोधन करणे, त्यांच्या अडीअडचणींची दखल घेऊन कारवाई करणे आदींचा त्यात प्रामुख्याने समावेश आहे. १९९२मध्ये विशेष कायद्यान्वये स्थापन झालेल्या या आयोगाला दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहेत.*
*👉🟥🟥👉अत्यंत तळागाळापासून काम सुरू करून विविध राजकीय आणि सामाजिक जबाबदाऱ्या उत्तम पेलत विजयाताईंचे नेतृत्व विकसित होत गेले. प्रत्येक ठिकाणी समरसतेने काम करून आपल्या कौशल्याचा १०० टक्के लाभ त्या पदाला देऊन ती जबाबदारी सर्वोत्तम पार पाडणे हे विजयाताईंचे वैशिष्ट्य राहिले आहे. महाराष्ट्र भाजप युवा मोर्च्याच्या उपाध्यक्ष ते भाजप महिला मोर्च्याच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि आता भाजपच्या राष्ट्रीय सचिव असा त्यांचा प्रवास आहे. त्या भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या प्रदीर्घकाळ सदस्यादेखील राहिल्या आहेत. सध्या त्या राजस्थान भाजपच्या सहप्रभारी म्हणून पक्षाचे काम करत आहेत. राजस्थान विधानसभेमध्ये भाजपने मिळविलेल्या यशामध्ये त्यांचा मोठा सहभाग राहिला आहे.*
*👉🔴🔴👉भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष असतानाच त्यांची महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून नियुक्ती (२०१६ ते २०२१) झाली होती. महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून विजयाताईंनी “सक्षमा”, “प्रज्ज्वला”, “सुहिता” यांसारखे महिला केंद्रित कितीतरी उपक्रम राबवले. भौतिक शास्त्रात पदवी आणि इतिहासात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विजयाताईंनी अनेक पुस्तके लिहिली असून त्यामध्ये ‘विधिलिखित’ या महिलांच्या कायदेविषयक पुस्तक मालिकेचे संपादन , ‘अग्निशिखा धडाडू द्या’, ‘औरंगाबाद : लीडिंग टू वाईड रोड्स’, ‘मॅजिक ऑफ ब्लू फ्लेम’ यांचा समावेश आहे. महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल त्यांना राष्ट्रीय कायदा पुरस्कार, तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचा सावित्रीबाई फुले पुरस्कार यांनी सन्मानित करण्यात आले आहे.*