अकरा वर्षांपूर्वीच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात आदेश
पुणे, दि. ३१ मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील शुक्रवारी (दि. 31) प्रथम वर्ग न्यायालयात हजर झाले. 2013 मध्ये कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणुकीचा गुन्ह्यामध्ये न्यायालयाने त्यांना वॉरंट बजावले होते.
या प्रकरणात न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी जरांगे पाटील यांना ५०० रुपये दंड ठोठावला. तो भरल्यानंतर जरांगे पाटील यांचे वॉरंट रद्द करण्यात आले. एका संघटनेकडून 2013 मध्ये एका नाटकाचे आयोजन केले होते. या नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर त्याचे पैसे देण्यात आलेले नव्हते, असा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी न्यायालयामध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार (कलम १५६, (३)) कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, जरांगे यांच्या बाजूने अॅड. हर्षद निंबाळकर यांनी बाजू मांडली.