img 20240112 wa0007
मुंबई, दि. 11 : स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2023 मध्ये महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक पटकावला असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्ली येथील भारत मंडपम मध्ये झालेल्या सोहळ्यात गुरूवारी हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ.के.एच.गोविंदराज यांनी राज्याच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्री हरदीप सिंह पुरी यावेळी उपस्थित होते.

स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2023 चे निकाल आज जाहीर झाले. त्यात महाराष्ट्राने पहिल्यांदाच इतर राज्यांना मागे टाकून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळविला आहे. मागील वर्षी मध्यप्रदेश राज्याला हा पुरस्कार मिळाला होता. देशात इंदूर आणि सुरत या शहरांनी संयुक्त प्रथम क्रमांक पटकावला असून नवी मुंबई हे देशातील तिसरे स्वच्छ शहर ठरले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त राजेश नार्वेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

राष्ट्रीय स्तरावरील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पुरस्कारांपैकी तीन पुरस्कार राज्यातील नवी मुंबई महानगरपालिका, सासवड नगरपालिका तसेच लोणावळा नगरपालिकांना प्राप्त झाले आहेत. नवी मुंबईने देशातील सर्वात स्वच्छ शहरांत सेव्हन स्टार मानांकनासह आपले तिसरे स्थान कायम राखले आहे. तर एक लाख पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरात सासवड देशात पहिले तर लोणावळा शहर देशात तिसऱ्या स्थानांवर आहे. या संस्थांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याव्यतिरिक्त पुणे महानगरपालिका (स्वच्छतेत 10 वा क्रमांक) तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका (फाईव्ह स्टार मानांकन आणि वॉटरप्लस मानांकनासह स्वच्छतेत 13 वा क्रमांक), गडहिंग्लज (25 ते 50 हजार लोकसंख्येचे स्वच्छ शहर- पश्चिम विभाग), कराड (50 हजार ते एक लाख लोकसंख्येचे स्वच्छ शहर- पश्चिम विभाग), पाचगणी (15 हजारांहून कमी लोकसंख्येचे स्वच्छ शहर- पश्चिम विभाग) (देशात 28 वा क्रमांक) यांना देखील राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त झाले आहेत. एक लाख पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या स्वच्छतेच्या मानांकन प्राप्त प्रथम 10 शहरांपैकी आठ शहरे महाराष्ट्रातील असून यामध्ये सासवड, लोणावळा, गडहिंग्लज, कराड, पाचगणी या शहरांव्यतिरिक्त विटा, देवळाली, सिल्लोड या शहरांचाही समावेश आहे.

मागील वर्षी राज्यातील केवळ नवी मुंबई या एका शहरास सेव्हन स्टार दर्जा प्राप्त झाला होता. तो दर्जा नवी मुंबईने यावर्षी देखील कायम राखला आहे. देशात केवळ तीन शहरांना सेव्हन स्टार दर्जा प्राप्त आहे. यावर्षी पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन शहरांनी फाइव्ह स्टार दर्जा मिळविला आहे. तर 28 शहरांना थ्री स्टार दर्जा प्राप्त झाला असून या गटात महाराष्ट्र देशपातळीवर प्रथम आहे. या शिवाय 81 शहरांना वन स्टार दर्जा प्राप्त झाला आहे.

स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये महाराष्ट्र राज्यातील फक्त चार शहरांना वॉटर प्लस दर्जा मिळाला होता. त्यात वाढ होऊन स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये महाराष्ट्रातील 21 शहरांना वॉटर प्लस दर्जा प्राप्त झाला आहे. देशातील सर्वाधिक वॉटर प्लस शहरे आता महाराष्ट्रात झाली आहेत. स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये 200 शहरांना ओडीएफ प्लस प्लस दर्जा प्राप्त होता. स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये 264 शहरांना ओडीएफ प्लस प्लस दर्जा प्राप्त झालेला आहे.

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान (नागरी) 2.0 च्या धर्तीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 सन 2021 ते सन 2026 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अभियानात शाश्वत घन कचरा व्यवस्थापन, शाश्वत स्वच्छता आणि वापरलेल्या पाण्याचे व्यवस्थापन ही उद्दिष्टे साध्य करण्यात येणार आहेत. तसेच सन 2026 पर्यंत राज्यातील सर्व शहरे कचरा मुक्त (जीएफसी) 3 स्टार मानांकन आणि ओडीएफ प्लस प्लस, तसेच एक लक्षपेक्षा कमी लोकसंख्या असलेली 50 टक्के शहरे वॉटर प्लस करण्याचे उद्दिष्ट आहे.

ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ.के.एच.गोविंदराज यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ महाराष्ट्र अभियान संचालनालयामार्फत सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. पुरस्कार स्वीकारताना नगरविकास विभागाचे उपसचिव अनिरूद्ध जेवळीकर, स्वच्छ महाराष्ट्र अभियान संचालक नवनाथ वाठ आदी उपस्थित होते.

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!