मुंबई, दि 15 : महाराष्ट्र आज विदेशी थेट गुंतवणुकीत देशात प्रथम क्रमांकावर आहे. यामुळे रोजगार देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. राज्य कृषि, शिक्षण, ऊर्जा, पायाभूत सुविधा, आरोग्य आणि पर्यटन अशा सर्व क्षेत्रात देशात क्रमांक एकवर राहील हा आमचा विश्वास आहे. त्यासाठी आपण सर्वजण शपथबध्द होऊया आणि प्रयत्नशील राहूया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंत्रालय प्रांगणात ध्वजारोहण झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय, मुख्य सचिव मनोज सौनिक, अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, राजशिष्टाचार विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर,माहिती व जनसंपर्क महासंचालक जयश्री भोज, भारतीय सेनेच्या तिन्ही दलाचे मुंबई येथील प्रमुख अधिकारी यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी,मंत्रालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, जिजाऊ माँ साहेब यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
मुख्यमंत्र्यांनी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांनी देशासाठी आपले प्राण अर्पण केलेल्या ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीर,शहीद यांना वंदन केले.
मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले की, राज्याचा प्रमुख म्हणून सर्वसामान्य माणसांच्या हितासाठी काम करता आलं याचं समाधानही आज माझ्या मनात आहे.या स्वातंत्र्याला खरा अर्थ प्राप्त करून द्यायचा असेल तर या राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यात आपल्याला आनंद निर्माण करता आला पाहिजे असेही ते म्हणाले.
समाजातील शेवटच्या घटकाला स्वातंत्र्य आणि विकास अनुभवता यावा यासाठी गरजूंच्या वेदनेवर फुंकर घालता आली पाहिजे. तळागाळातील लोकांपर्यंत शासकीय योजना पोहोचल्या पाहिजेत असा शासनाचा मानस असून स्वराज्याचं रूपांतर सुराज्यात झालं पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेरी माटी मेरा देश अशी घोषणा करून आपल्याला या जबाबदारीचं स्मरण करून दिलं आहे.आजच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने या आवाहनाचं जबाबदारीनं पालन करून या अभियानात आपण मोठ्या संख्येनं सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केले.
गेल्या पाच वर्षात देशातील साडे तेरा कोटी जनतेला दारिद्रय रेषेबाहेर काढून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील गरिबांना जगण्याचे नवे बळ दिले. जनधन खात्यांच्या माध्यमातून महिलांना आत्मसन्मान मिळवून दिला. आता डीबीटीमुळे बंदा रुपया बँक खात्यात जमा होतोय.त्यामुळे योजनाच्या अंमलबजावणीत पारदर्शकता वाढली आहे असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, स्वातंत्र्याचा खरा अर्थ असतो जबाबदारी. ही जबाबदारी आहे देशाचा विकास करण्याची, एक चांगला समाज घडवण्याची आणि सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाण्याची.केंद्राप्रमाणेच राज्यातही विकासाची, प्रगतीची गंगा वाहावी यासाठी गेले वर्षभर काम करता आले.याचा विशेष आनंद आजच्या स्वातंत्र्यदिनी आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातील समन्वयाचा नवा अध्याय आम्ही लिहितोय, असे ते म्हणाले.
शासनाने वर्षभरात घेतलेले महत्त्वाचे निर्णय
‘शासन आपल्या दारी सारख्या क्रांतिकारी योजनेत सव्वा कोटीपेक्षा जास्त लाभार्थ्याना करोडो रुपयांचे लाभ आपण दिले. या योजनेचा लाभार्थी माझ्यासमोर येतो, तेंव्हा त्याच्या डोळ्यात मला जो आनंद दिसतो.त्यात मला स्वातंत्र्याचा खरा अर्थ सापडतो असेही त्यांनी यावेळी सांगितले
शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देण्यात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर
शेतकऱ्यांसाठी आम्ही केवळ एक रुपयात पीक विमा योजना जाहीर करून देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या राज्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात पीक विमा भरला. यामुळे दीड कोटी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ झाला.आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना प्रसंगी निकषाबाहेर जाऊन मदत केली आहे.आजवर साडे बारा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत आपल्या सरकारने बळीराजाला दिली आहे,असेही त्यांनी यावेळी सांगितले.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत केंद्राच्या 6 हजार रुपयांमध्ये राज्यातर्फे 6 हजार रुपये भर टाकली असून दरवर्षी 12 हजार रुपये शेतकऱ्यांना देत आहोत. 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना यांचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. रखडलेल्या 35 जलसंपदा प्रकल्पांच्या कामांना वेग दिला.जवळपास आठ लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.जलयुक्त शिवार योजनाही आपण पुन्हा सुरू केली. समुद्रात वाहून जाणाऱ्या कोकणातील नद्यांचे पाणी वळविण्यासाठी नदीजोड प्रकल्प घेण्यात येत आहे.
मराठवाडा वॉटर ग्रीडच्या माध्यमातून नद्यांचे पाणी दुष्काळग्रस्त भागाकडे वळविण्याचे प्रयत्न सुरू
असल्याचे सांगितले .
शासनाने ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास मोफत केला असून महिलांना प्रवासात 50 टक्के सवलत दिली. याचा करोडो नागरिकांना याचा लाभ झाला.
18 वर्ष पूर्ण होईपर्यंत मुलीस एक लाख रुपये अर्थसहाय देणारी ‘लेक लाडकी’ सारखी योजना सुरू केली.
दिव्यांग बांधव आणि भगिनींसाठी स्वतंत्र विभाग सुरू केला. गेल्या वर्षभरात मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातून 12 हजारांहून अधिक रुग्णांना आम्ही 100 कोटी रुपये मदत केली.
महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत विमा संरक्षण दीड लाखांवरून 5 लाखांपर्यंत वाढवलं. राज्यातील प्रत्येक नागरिकांसाठी ही योजना लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकाला सर्व शासकीय रुग्णालयांत मोफत तपासणी आणि उपचार देण्याचा व राज्यात गोरगरीब लोकांसाठी वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना सुरू केली.
वस्त्रोद्योग, माहिती तंत्रज्ञान, ग्रीन हायड्रोजन, बंदरे, यांची नवीन धोरणे आम्ही आणली आहेत. राज्यात रिक्त शासकीय पदांची भरती वेगाने सुरू आहे.
सर्वच शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, बूट, मोजे देण्याच्या निर्णय घेतला. करोडो असंघटित कामगारांसाठी महामंडळ स्थापन केलं आहे.
दुर्लक्षित हजारो सफाई कामगारांसाठी लाड समितीच्या शिफारशी लागू केल्या. त्यांना नोकरी आणि घराची शाश्वती दिली. निराधारांचं निवृत्ती वेतन, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामसेवकांचं मानधन, विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप, अनुसूचित विद्यार्थ्याचा निर्वाह भत्यात भरीव वाढ केली आहे. सारथी, बार्टी, महाज्योती, अमृत, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अशा संस्थांमार्फत आम्ही मागास, दुर्बल, गरीब युवकांना उज्ज्वल भविष्य देत आहोत. उमेद अभियानातील महिलांच्या स्वयंसहाय्यता गटांच्या खेळत्या भांडवलात दुपटीने वाढ केली असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी 9 वर्षापूर्वी शपथ घेताना म्हटले होते की, आम्ही दिलेली आश्वासने म्हणजेआमच्या कामाची दिशा आहे. आमचे ते लक्ष्य आणि आमची ती कटिबद्धता आहे. देशाला आत्मनिर्भर आणि सामर्थ्यशाली करण्याचे स्वप्न आपल्याला साकार करायचे आहे. याच भावनेने महाराष्ट्राचीही वाटचाल सुरू आहे असेही मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी सांगितले.