img 20230801 wa0017
*प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पुणे मेट्रोच्या मार्गिकांसह विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन*

*मेट्रो ही आधुनिक भारतातील शहरांची जीवनरेखा- प्रधानमंत्री*

*देशाला ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्यासाठी महाराष्ट्र योगदान देईल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*

पुणे, दि. १: शहरी मध्यमवर्गीयांच्या जीवनशैलीविषयी सरकार गंभीर असून सर्वसामान्यांचे जीवन सुकर करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आधुनिक बनवावे लागेल. त्यादृष्टीने पुणे शहरात मेट्रो सुरू करण्यात आली असून मेट्रो ही आधुनिक भारतातील शहरांची जीवनरेखा बनत आहे, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.

प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी पुणे मेट्रोच्या टप्पा २ च्या पूर्ण झालेल्या दोन मार्गिकांचे हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण केले. शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालय येथे आयोजित या कार्यक्रमात मेट्रो लोकार्पणासह पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत कचऱ्यापासून ऊर्जा निर्माण करणाऱ्या (वेस्ट टू एनर्जी) संयंत्राचे उद्घाटन, पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांचे लाभार्थ्यांना हस्तांतरण, पिंपरी चिंचवड मनपा आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरांचे भूमिपूजन प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित होते.

*पुणे शहर हे युवकांची स्वप्ने पूर्ण करणारे शहर*
पुणे शहर हे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देणारे, युवांची स्वप्ने पूर्ण करणारे शहर आहे, असे सांगून प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले, या पाच वर्षात पुण्यात सुमारे २४ कि.मी. मेट्रोचे नेटवर्क सुरू झाले आहे. पुण्यासारख्या शहरात प्रदूषण कमी करण्यासाठी मेट्रो रेल्वे आवश्यक असून हे जाळे वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. २०१४ पर्यंत देशात २५० कि.मी. पेक्षा कमी मेट्रो नेटवर्क होते. आता देशात ८०० कि.मी. पेक्षा अधिक मेट्रोचे जाळे तयार झाले असून आणखी 1 हजार किलोमीटरचे काम सुरू आहे. २०१४ मध्ये फक्त ५ शहरात असलेली मेट्रो आज देशातील २० शहरात संचालित आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि नागपूर येथे मेट्रो कार्यरत आहेत. मेट्रो ही आधुनिक भारतातील शहरांची नवी ‘जीवनरेषा’ बनत आहे, असेही श्री. मोदी म्हणाले.

*‘वेस्ट टू वेल्थ’ संकल्पनेवर भर*
श्री. मोदी पुढे म्हणाले, जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी स्वच्छता महत्वाची आहे. आम्ही स्वच्छ भारत अभियान केवळ शौचालयांच्या निर्मतीपूरते मर्यादित ठेवले नाही तर कचरा व्यवस्थापनावर भर देत आहोत. कचऱ्याचे डोंगर हटविण्यासाठी प्रयत्न करत आहोत. ‘वेस्ट टू वेल्थ’ या संकल्पनेवर भर देत आहोत. पिंपरी चिंचवडचा ‘वेस्ट टू एनर्जी’ खूप उत्कृष्ट प्रकल्प असून यातून कचऱ्यापासून वीज बनणार आहे. यामुळे प्रदुषणाची समस्या नष्ट होण्यासह महापालिकेची आर्थिक बचतही होणार आहे.

*महाराष्ट्राने देशाच्या औद्योगिक विकासाला गती दिली*
स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाने देशाच्या औद्योगिक विकासाला गती दिली आहे. म्हणून येथे औद्योगिक विकासाला अधिक गती देण्यासाठी पायाभूत सुविधांवर अधिक भर देण्यात येत आहे. रेल्वेच्या विकासात २०१४ च्या तुलनेत १२ पट अधिक खर्च केला जात आहे. महाराष्ट्राच्या विविध शहरांना आसपासच्या इकॉनॉमिक हबशी जोडले जात आहे. मुंबई- अहमदाबाद हायस्पीड रेल्वे, दिल्ली मुंबई इकॉनॉमिक कॉरिडॉरमुळे औद्योगिक विकास होणार आहे. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर मुळे महाराष्ट्राची उत्तर भारतासोबत रेल्वे जोडणी वाढणार आहे. महाराष्ट्र, तेलंगणा आणि छत्तीसगड यांच्यादरम्यान बनविण्यात आलेल्या पारेषण वाहिनी जाळ्यामुळे महाराष्ट्रातील उद्योगांना नवी गती मिळणार आहे. त्याचबरोबर ऑईल गॅस लाईन, औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी, नवी मुंबई विमानतळ, सेंद्रा बिडकीन औद्योगिक पार्क यांच्यात महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला नवी गती देण्याची क्षमता आहे.

*डिजीटल क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासात पुण्याचा मोठा वाटा*
महाराष्ट्राचा विकास होईल तेव्हा भारताचा विकास होईल आणि भारताचा विकास होईल त्याचा तेवढाचा लाभ महाराष्ट्राला होईल. गेल्या ९ वर्षात इनोव्हेशन आणि स्टार्टअपच्या बाबतीत भारताने जगात नवी ओळख मिळवली आहे. आज स्टार्टअपची संख्या १ लाखाच्या वर झाली आहे. ही इकोसिस्टीम डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरच्या विस्तारामुळे तयार झाली आहे. भारतात डिजीटल इन्फ्रास्ट्रक्चरचा पाया घालण्यात पुण्याचा मोठा वाटा आहे. स्वस्त स्मार्टफोन, गावोगावी पोहोचलेल्या इंटरनेट सुविधेमुळे हे शक्य झाले आहे. जगभरात सर्वाधिक वेगाने ५ जी इंटरनेट सुविधा पोहोचवणारा आपला देश बनला आहे. फिनटेक, बायोटेक, ॲग्रीटेक आदी सर्वच क्षेत्रात आपले युवा उत्कृष्ट काम करत आहेत.

*गरीबांसाठी ४ कोटीपेक्षा अधिक घरांची निर्मिती*
गेल्या ९ वर्षात गाव आणि शहरात गरीबांसाठी ४ कोटीपेक्षा अधिक पक्क्या घरांची निर्मिती केली आहे. त्यातही शहरी गरिबांसाठी ७५ लाखापेक्षा अधिक घरे बनविली आहेत. नवीन घरांच्या निर्मितीमध्ये पारदर्शकता आणली असून गुणवत्ताही सुधारली आहे. त्यातील जास्तीत जास्त घरे महिलांच्या नावावर करण्याचे काम आम्ही केले आहे. पहिल्यांदाच महिलांच्या नावावर काही संपत्ती नोंदणीकृत झाली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधलेल्या घरांमुळे नागरिकांसाठी येणारे सण विशेष आनंदाचे ठरतील, असेही प्रधानमंत्री म्हणाले.

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!