तणावमुक्त जीवनासाठी भागवत कथेतील उपदेश उपयुक्त-राज्यपाल रमेश बैस

img 20230731 wa0020
पूणे,दि.३१: तणावमुक्त जीवनासाठी भागवत कथेतील उपदेश उपयुक्त असून तरुणांनी भागवत कथा कार्यक्रमात सहभागी व्हावे आणि श्रीमद्भागवत कथेतील उपदेशाचे पालन करावे, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

लोणावळा येथील नारायणी धाम येथे आयोजित श्रीमद्भागवत कथा कार्यक्रमात राज्यपाल श्री. बैस सहभागी झाले होते त्यावेळी ते बोलत होते. प.पू.स्वामी गिरीशानंद सरस्वती महाराज यावेळी उपस्थित होते.

राज्यपाल म्हणाले, मानव जीवन अनमोल आहे. भागवत कथेमुळे मानवी मनाचे शुद्धीकरण होऊन शांती आणि मुक्ती मिळते. सत्संगामुळे विवेक मिळतो आणि प्राणीमात्रांचा लौकिक व आध्यात्मिक विकास होतो. श्रीमद्भागवत कथेतील उपदेशाचे पालन केल्यास आणि उद्देशपूर्ण जीवनपद्धतीचा अंगिकार केल्यास युवकांना संयमी आणि सक्षम व्यक्तिमत्व घडविता येईल.

श्री गिरीशानंद सरस्वती महाराजांनी नर्मदा शुद्धीकरणासाठी मोठे कार्य केले आहे, असेही राज्यपाल यावेळी म्हणाले.

राज्यपाल महोदयांनी राजकीय आणि सामाजिक जीवनात समर्पण भावनेने कार्य केले असल्याचे गिरीशानंद सरस्वती महाराज म्हणाले. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाची त्यांनी प्रशंसा केली आणि नवीन शैक्षणिक धोरणाचे स्वागत केले.