पीक विमा योजनेमध्ये ६६ लाख शेतकऱ्यांचा सहभाग- कृषी आयुक्त सुनील चव्हाण

पुणे दि १७ : राज्य शासनाच्या एक रुपया पीक विमा योजनेमध्ये आजपर्यंत ६६ लाख ५ हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला असून प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत ३१ जुलै पर्यंत आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे.

राज्यात विमा संरक्षित क्षेत्र ४२.३० लाख हेक्टर आहे. राज्याचे १ ते १७ जुलैपर्यंतचे सरासरी पर्जन्यमान ३८९.१ मिमी असून यावर्षी आत्तापर्यंत २९४.६० मिमी म्हणजे सरासरीच्या ७६ टक्के पाऊस झाला आहे. सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत राज्यामध्ये ५२ तालुक्यांमध्ये २५ ते ५० टक्के, १३६ तालुक्यांमध्ये ५० ते ७५ टक्के तर १०९ तालुक्यांमध्ये ७५ ते १०० टक्के पाऊस झाला असून ५८ तालुक्यांमध्ये १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.

खरीप हंगामातील राज्याचे सरासरी पेरणीचे क्षेत्र १४२ लाख हेक्टर असून आजपर्यंत ८८.४४ लाख हेक्टरवर (६२ टक्के) पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सद्यस्थितीत ठाणे, गोंदिया, रायगड, सांगली, भंडारा या पाच जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत कमी क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

*कापूस व सोयाबीनची ८३ टक्के पेरणी*
राज्यात पेरणीच्या कामास वेग आला असून कापूस व सोयाबीन पिकाच्या उपलब्ध क्षेत्राच्या तुलनेत सरासरी ८३ टक्के पेरणी झाली आहे. कापूस, सोयाबीन, तूर या पिकांच्या पेरण्या तसेच भात पिकाच्या पुनर्लागवडीची कामे सुरु आहेत.

राज्यात गरजेच्या तुलनेत सद्यस्थितीत १०० टक्के बियाणांचा पुरवठा झाला आहे. सद्यस्थितीत उपलब्ध ४८.३४ लाख मे. टन खतापैकी २१.३१ लाख मे. टन खतांची विक्री झाली असून २७.०३ लाख मे. टन खत उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी फसवणूक टाळण्यासाठी खत खरेदीची पावती व टॅग जपून ठेवावेत. कृषीविषयक योजनांच्या माहितीसाठी व तक्रारींचे निवारण करण्यासाठी १८००२३३४००० या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहनही कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.