img 20230708 wa0022

*दामिनी पथक सक्षम करण्यासाठी सहकार्य करणार-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील*

पुणे दि. ८ : पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात कार्यरत असलेले दामिनी पथक सक्षम करण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

चिंचवड पोलिस आयुक्तालयात आयोजित जिल्हा नियोजन निधीतून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी खरेदी करण्यात आलेल्या ५ स्कॉर्पिओ आणि १२ बोलेरो वाहनांच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, दिलीप मोहिते, उमा खापरे, पोलिस आयुक्त विनय कुमार चोबे, सह पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, महिलांच्या सुरक्षेसाठी पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत दामिनी पथकांची संख्या वाढवावी. त्यासाठी वाहने कमी पडू देणार नाही. सायबर क्राईम लॅबची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील दिशा उपक्रमात सहभागी ७ अशासकीय संस्थांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन त्यांच्या सहभाग वाढवावा. ज्येष्ठ नागरिक कक्षाद्वारे ज्येष्ठांच्या समस्या वेळेत सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत.

नवीन वाहनांच्या समायोजनामुळे पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तलयातील बरासचा वाहतुकीचा प्रश्न मिटण्यास मदत होणार असून गस्त घालण्यासाठी वाहनांची मदत होईल. पोलिसांच्या वसाहती, रिक्त पदे, जलद प्रतिसाद पथक, प्रलंबित प्रस्ताव व इतर मागण्या आणि समस्या याविषयी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन प्रश्न निकाली काढले जातील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

यावेळी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!