पुणे, दि. २७: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ अंतर्गत लघु उद्योग व्यवसायासाठी थेट कर्ज योजना राबविण्यात येत असून त्यासाठी ३१ जुलै २०२३ पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
महामंडळामार्फत अनुदान योजना, बीज भांडवल योजना तसेच थेट कर्ज योजना अशा तीन योजना राबविण्यात येतात. थेट कर्ज योजनेचा लाभ मातंग समाज व त्यामध्ये अंतर्भाव असणाऱ्या मांग, मातंग, मिनी मादिग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी व मादिगा या १२ पोट जातींना घेता येणार आहे. अर्जदार पुणे जिल्ह्यातील रहिवासी असावा. वय १८ वर्षे पूर्ण व ५० वर्षाच्या आत असावे. सीबील क्रेडिट स्कोअर किमान ५०० असावा. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस योजनेचा लाभ घेता येईल. वेळोवेळी महामंडळाने घातलेल्या अटी, शर्ती बंधनकारक राहतील.
योजनेअंतर्गत १ लाख रुपयांच्या प्रकल्प मूल्यासाठी महामंडळाचे बीजभांडवल ८५ हजार रुपये, अनुदान १० हजार रुपये, अर्जदाराचा सहभाग ५ हजार रुपये असून बीजभांडवल रक्कमेवर ४ टक्के व्याजदर असणार आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी भौतिक उदिष्ट ९० प्रकरणांचे प्राप्त झाले आहे. उद्दिष्टापेक्षा अधिक अर्ज आल्यास लॉटरी पद्धतीने निवड करण्यात येईल.
अर्जासोबत उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, शिधापत्रिका, आधार कार्ड, पॅन कार्डची छायांकित प्रत, व्यवसायासाठी आवश्यक जागेचा पुरावा, तीन पासपोर्ट आकाराची छायाचित्रे, व्यवसायाचे दरपत्रक, व्यवसायासंबंधी तांत्रिक प्रमाणपत्र व अनुभवाचा दाखला, शैक्षणिक दाखला, अनुदान, कर्जाचा लाभ न घेतल्याबाबतचे स्वत:चे प्रतिज्ञापत्र, आधार क्र. जोडणी केलेल्या बँक खात्याचा तपशील, ग्रामसेवकाचे शासकीय योजनेचा लाभ घेतला नसल्याबाबत प्रतिज्ञापत्र, दुकाने अनुज्ञप्ती/ उद्योग आधार जोडणे आवश्यक आहे.
इच्छुक व पात्र अर्जदारांनी अटी व शर्ती, अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे, विहित नमुन्यातील अर्ज आदींबाबत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सर्वे नंबर १०३,१०४ मेंटल कॉर्नर, विश्रांतवाडी पोलीस स्टेशनसमोर, येरवडा, पुणे दूरध्वनी क्र. ०२०-२९७०३०५७ येथे संपर्क साधून माहिती घ्यावी, असे महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक शिवाजी मांजरे यांनी कळवले आहे.
0000