ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटविषयी जनजागृतीवर भर द्या- मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

‘विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम- २०२४ व ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यांची प्रथमस्तरीय तपासणी (एफएलसी)’ या विषयावर यशदा येथे आयोजित महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यशाळेत दुसऱ्या दिवसातील प्रथम सत्रात मार्गदर्शन करताना मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे बोलत होते. यावेळी भारत निवडणूक आयोगाचे सहसचिव ओ. पी. सहानी, पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर आदी उपस्थित होते.
ईव्हीएममधील प्रक्रिया पारदर्शक असून त्यामध्ये कोणताही प्रकारचा मानवी हस्तक्षेप करता येत नाही, असे सांगून श्री. देशपांडे म्हणाले, निवडणूक प्रकियेच्यावेळी ईव्हीएम जोडताना मतदान कक्षात स्वतंत्र वीज जोडणी असल्याची खात्री करावी. ईव्हीएमवर सूर्यप्रकाश, पाऊस आदी तांत्रिक बाबीचा होणारा परिणामाबाबत पडताळणी करुन घ्यावीत. यासाठी निवडणूकीपूर्वी अभिरुप मतदान (मॉकपोल) घेण्यात यावेत. ईव्हीएम व व्हीव्हीपॅट हाताळताना घेण्यात येणाऱ्या दक्षतेबाबत प्रशिक्षण सत्राचे आयोजन करावे.
श्री. देशपांडे पुढे म्हणाले, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट या तंत्रज्ञानाविषयी वस्तूनिष्ठ माहिती होण्यासाठी शाळा, महाविद्यालयामध्ये शिबीरे, प्रश्नंमजूषा आयोजित करावी. प्रचार प्रसिद्धीसाठी निवडणूक प्रक्रियेविषयी माहिती देणारे छोटे-छोटे भाग करुन चित्रफिती तयार कराव्यात आणि समाजमाध्यमाचा वापर करावा.
सहसचिव श्री. सहानी म्हणाले, सार्वत्रिक निवडणूकीच्यावेळी ईव्हीएम ताब्यात घेताना आवश्यक तांत्रिक बाबी विचारात घेऊनच ताब्यात घेण्यात याव्यात. व्हीव्हीपॅटमध्ये तांत्रिक अडचण असल्यास संपूर्ण संच बदलण्यात येतो, असेही श्री.सहानी म्हणाले.
भोर-वेल्हाचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी ईव्हीएम हाताळताना घ्यावयाची काळजी, ईव्हीएम बाबतचे गैरसमज व त्याअनुषंगाने करावयाच्या उपायोजना, ईव्हीएम विषयी न्यायालयीन याचिका, न्यायनिवाडे, परिपत्रके, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, मॉकपोल, व्हीव्हीपॅट, निवडणूक साहित्य वाटप, साहित्य ताब्यात घेताना घ्यावची काळजी आदी विषयाबद्दल माहिती दिली.
यावेळी राज्यातील विविध जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी निवडणूक प्रकियेत काम करताना आलेले अनुभव मांडले.