पुणे, दि.२२ :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पुरंदर येथे 3 जुलै रोजी ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असून लाभार्थ्यांना वैयक्तिक योजनांचा लाभ देण्यासाठी सर्व यंत्रणांनी पूर्वतयारी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले.

मेळाव्याच्या आयोजनाच्या पूर्वतयारीसाठी दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम आणि जिल्ह्यातील विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यातील प्रत्येक गावनिहाय लाभार्थी निवड करावी व त्यांना वैयक्तिक अर्थसहाय्याच्या योजनांचा लाभ देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. मेळाव्याच्या आयोजनासाठी आवश्यक सुविधांचीदेखील पूर्वतयारी करावी. सूक्ष्म नियोजन करून मेळाव्याच्या ठिकाणी लाभार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध होतील याची दक्षता घ्यावी. मेळाव्याच्या तयारीबाबत दररोज आढावा घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

लाभार्थ्यांना विशेष सहाय्य योजनांचे लाभार्थी शोधून त्यांना लाभ देण्यासाठी आवश्यक प्रक्रीया पूर्ण करावी. कृषि विभाग आणि पशुसंवर्धन विभागाने शेतकऱ्यांच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी आवश्यक नियोजन करावे. मेळाव्यासाठी समन्वयक अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

श्री. आयुष प्रसाद म्हणाले, जिल्हा परिषदेतर्फे २२ हजार दिव्यांगाना लाभ देण्याचे नियोजन आहे. कृषि विभागाच्या माध्यमातून १ हजार ७०० आणि ७ हजार घरकूलाच्या लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे. महाडीबीटीच्या माध्यमातून कृषि, महिला व बालविकास आणि समाज कल्याण विभागाच्या लाभार्थ्यांना लाभ देण्यात येईल. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून १३ प्रकारचे दाखले देण्यासाठी पुढील १५ दिवसात विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. गावपातळीवर पशुसंवर्धन व आरोग्याचे मेळावे घेण्यात येणार आहेत. सरपंच आणि ग्रामसेवकांची बैठक घेवून आवश्यक नियोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

श्रीमती कदम म्हणाल्या, मेळाव्याच्या ठिकाणी मतदार नोंदणी आणि आधार कार्डच्या सुविधेबाबत व्यवस्था करावी. विविध योजनांअंतर्गत घरकूलाचे वाटप, आरोग्य योजनांचा लाभ देण्यासाठी संबंधित विभागाने पुढाकार घेवून कार्यवाही करावी. जिल्हा अग्रणी बँकेमार्फत मुद्रा बँक कर्ज, क्रेडीट कार्ड वाटप आदी योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न करावा. मेळाव्यात लाभार्थ्यांना लाभ देण्याच्यादृष्टीने आवश्यक सर्व कार्यवाही संबंधितांनी करावी. योजनेच्या नावाप्रमाणे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना लाभ देण्याचा प्रयत्न करावा, असे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी वैयक्तिक लाभाच्या योजनेचा नागरिकांना लाभ देण्याबाबत करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली. अधिकाऱ्यांनी योजना आणि तालुकानिहाय लाभार्थ्यांची माहिती सादर करावी, असेही श्रीमती कदम यांनी सांगितले.

कौशल्य विकास विभागातर्फे रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत आहे. आभा कार्ड, प्रधानमंत्री मातृवंदना योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. नगरपालिकांच्या माध्यमातूनही विविध योजनांचा लाभ देण्यासाठी नियोजन करण्यात येत असल्याची माहितीही यावेळी देण्यात येईल.

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!