शासन आपल्या दारी’ उपक्रमाअंतर्गत बुधवारी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाअंतर्गत बुधवारी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

पुणे, दि. १३: ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाअंतर्गत तिसरा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ बुधवार १४ जून २०२३ रोजी सकाळी ११ वाजता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ४८१, रास्ता पेठ, पुणे- ११ येथे आयोजित करण्यात येणार असून इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत नोकरीइच्छुक युवक-युवतींना नामवंत खाजगी कंपन्या, कारखाने, उद्योगसमूह यांच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याकरीता जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात रोजगार मेळावे आयोजित करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’चे आयोजन करण्यात येत आहे. याद्वारे विविध पदांकरिता वेगवेगळ्या पात्रतेच्या उमेदवारांची ज्यांना तात्काळ नोकरभरती करावयाची आहे, अशा कंपन्यांचे प्रतिनिधी उमेदवारांच्या थेट प्रत्यक्ष मुलाखती घेण्याकरीता उपस्थित राहणार आहेत.

जिल्ह्यातील नोकरीइच्छुक युवक-युवतींनी अधिक माहितीसाठी http://www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. नोंदणी नसल्यास प्रथम आपली नावनोंदणी करावी. होमपेजवरील नोकरीसाधक लॉगीन मधून आपापल्या युझर आयडी व पासवर्डच्या आधारे लॉगीन करावे. त्यानंतर डॅशबोर्ड मधील पंडीत दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर या बटनावर क्लिक करुन प्रथम पुणे विभाग व नंतर पुणे जिल्हा निवडून त्यातील ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत 3 प्लेसमेंट ड्राईव्ह-पुणे रोजगार मेळाव्याची निवड करावी. उद्योजक निहाय त्यांच्याकडील रिक्तपदांची माहिती घेऊन आवश्यक पात्रता धारक रिक्तपदासाठी ऑनलाईन पद्धतीने आपला पसंतीक्रम नोंदवावा.

प्लेसमेंट ड्राईव्हच्या दिवशी उमेदवारांनी कागदपत्रांसह याठिकाणी उपस्थित रहावे. या उपक्रमाचा जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा, असेही जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र. सहाय्यक आयुक्त सागर मोहिते यांनी कळविले आहे.