मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचा ‘अभिमान पदयात्रे’मध्ये सहभाग

पुणे, दि.३: दरवर्षी जगभरात जून महिन्यात ‘एलजीबीटीक्यूआयए+’ समुदायाच्या अभिमान पदयात्रा (प्राइड परेड्स) आयोजित केल्या जातात. यंदा पुण्यातील ‘युतक’ या संस्थेच्या अभिमान पदयात्रेत महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, पुणे सहभागी होत आहे.

निवडणूक यंत्रणा अभिमान पदयात्रेत सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. ही पदयात्रा ४ जून रोजी सायंकाळी चार ते पाच वाजेदरम्यान संभाजीराजे उद्यान – डेक्कन बस स्थानक, गूड लक चौक – एफसी गेट – शिरोळे रोड – संभाजीराजे उद्यान या मार्गावर आयोजित केली जाणार आहे.

जून १९६९ मध्ये अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात एलजीबीटी (लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर) समुदायातील लोकांनी त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला होता. तेव्हापासून जून महिना हा या समुदायासाठी ‘प्राइड मंथ’ म्हणून ओळखला जातो. या महिन्यात ‘एलजीबीटीआयक्यू+’ समुदाय आपल्या विविध रंगांच्या रंगीबेरंगी झेंड्यासह ठिकठिकाणी पदयात्रा काढतात.

पुण्यातील या अभिमान पदयात्रेत मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, निवडणूक उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, ‘युतक’चे संस्थापक अनिल उकरंडे आणि ‘एलजीबीटीक्यूआयए+’ समुदाय हे सहभागी होणार आहेत. तसेच २ जून ते ३ जून या कालावधीत मांगल्य कार्यालय, दगडूशेठ दत्त मंदिर येथे तृतीयपंथी समुदायासाठी मतदार नोंदणीचे शिबिरही आयोजित करण्यात आले आहे.

तृतीयपंथी समुदाय आणि एकूणच एलजीबीटीक्यूआयए+ समुदाय यांना मुख्य प्रवाहातील समाजाची स्वीकारर्हता मिळण्यासाठी सर्वसामान्य पुणेकरांनी या पदयात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे.
0000