मुंबई, दि. २३ :- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवणाऱ्यांचे राज्यातील यशस्वींचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहे. या परीक्षेत राज्यातून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या डॉ. कश्मिरा संखे यांचेही मुख्यमंत्र्यांनी विशेष अभिनंदन केले आहे. डॉ. संखे यांच्यासह यशस्वी उमेदवारांना त्यांनी भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.’सारथी’ संस्थेच्या माध्यमातून या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांनीही लक्षणीय आणि घवघवीत यश मिळवले आहे, त्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी विशेष आनंद व्यक्त केला आहे.
शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, ‘भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल होण्यासाठी अपार मेहनत आणि कष्ट करण्याची तयारी ठेवावी लागते. या परीक्षेत यश मिळवणाऱ्या सर्वच यशंवत, गुणवतांचे मनापासून अभिनंदन. या सर्वांच्या यशात त्यांच्या कुटुंबियांचीही साथ महत्वाचे ठरते. म्हणूनच या यशस्वी उमेदवारांसह, त्यांच्या कुटुंबियांचेही अभिनंदन. या सर्व यशस्वींकडून प्रशासकीय सेवेच्या आपल्या माध्यमातून समाजाची ,पर्यायाने राज्य आणि देशाची सेवा घडेल, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी या सर्वांना पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत.