१६ एप्रिल कलाकार चार्ली चॅप्लिन जन्मदिन

********************************
*❀ १६ एप्रिल ❀*
*कलाकार चार्ली चॅप्लिन जन्मदिन*
********************************

जन्म – १६ एप्रिल १८८९ (लंडन)
स्मृती – २५ डिसेंबर १९७७ (स्वित्झर्लंड)

चार्ली चॅप्लिन यांनी जगभरच्या प्रेक्षकांवर राज्य केलं. जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातल्या माणसावर तो गारुड करू शकला. भाषेच्या बंधना विना पडद्यावरून तो कुठल्याही प्रेक्षकाशी संवाद साधू शकला. त्यासाठी त्यानं वापरलेली साधनं होती, भरपूर हासू आणि थोडेसे आसू!

एका निराधार बाळाचं पोटच्या मायेनं संगोपन करतो तो. पोत्याची झोळी करून त्यात त्या बाळाला ठेवतो. किटलीच्या नळीने दूध पाजतो. जुनी खुर्ची मध्यभागी फाडून बाळाची ‘पॉटी’ म्हणून वापरात आणतो. मोठय़ा पडद्यावर या सगळ्या गोष्टी घडत असताना धमाल उडत असते. पण तो हे सगळं पोटतिडकीनं करत असतो. त्याच्यातली आई आणि ते बाळ यांची नाळ अदृश्य स्वरूपात जुळलेली असते. खरं तर, तो त्या बाळाचा कुणीही नसतो, पण त्यांच्यातली माया आपणा प्रेक्षकांनाही अस्वस्थ करून जाते.

त्याचा ‘द किड्’ हा चित्रपट आपल्याला भारावून सोडतो. चार्ली चॅप्लिनने त्याच्या चित्रपटांमधून आपल्याला गडाबडा लोळायला लावून हसवलं, पण त्याचबरोबर त्यानं डोळ्यात टचकन् पाणी आणून रडवलंही. विचार करायला लावलं. जागतिक पटलावर एक महानायक म्हणून वावरला! स्वत:तल्या आत्मविश्वासामुळे अनेक वैशिष्टय़पूर्ण युक्त्या तो पडद्यावर साकारू शकला.

पडद्यावरच्या मस्तमौला चार्लीचं आगळंवेगळं रूप होतं, ‘एक टाइट कोट, बॅगी पॅन्ट, छोटी हॅट आणि मोठे शूज, आणि हो, चेहऱ्यावरची त्याची ती छोटीशी मिशी.’ त्याने त्याचं हे रूप समजून उमजूनच ठरवलं होतं. त्याला त्याचं बाह्य़रूप संपूर्णपणे विरोधाभासी हवं होतं. ती छोटीशी मिशी त्याच्या व्यक्तिमत्त्वाला, त्याच्या चेहऱ्यावरचे भाव न लपवता वयातला मोठेपणा, परिपक्वता देऊ शकेल हा त्याचा अंदाज होता आणि त्याचं हे बाह्य़रूप त्याची ओळखच ठरलं. या व्यक्तिरेखेबद्दल त्याचं म्हणणं होतं, ‘‘ज्या क्षणी मी तो पोशाख केला, मेकअप केला, त्या क्षणी मी ते व्यक्तिमत्त्व अनुभवू लागायचो. मी त्याला ओळखायचो आणि रंगमंचावर असेपर्यंत तो माझ्यात भिनलेला असायचा.’’

आयुष्याचं सार त्यानं पडद्यावर अनेक तऱ्हेनं जगापुढे मांडलं. खिल्ली उडवण्यासाठी दु:ख हे कारण असतं. खिल्ली उडवणे म्हणजे प्रतिकार करणे. निसर्गाच्या शक्तीपुढे स्वत:च्या हतबलतेतही आपण हसत राहिलं पाहिजे. प्रतिकूलतेचा हसत हसत सामना केला पाहिजे, नाही तर मानसिकरीत्या खचून जाल. म्हणूनच त्याच्या आयुष्याच्या जवळचा चित्रपट ‘द किड्’ याचं ओपिनग टायटल होतं, ‘‘अ पिक्चर विथ अ स्माइल अँड परहॅप्स अ टिअर.’’ जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातल्या माणसावर तो गारुड करू शकला. भाषेच्या बंधनाविना पडद्यावरून तो कुठल्याही प्रेक्षकाशी संवाद साधू शकला. त्यासाठी त्यानं वापरलेली साधनं होती, भरपूर हासू आणि थोडेसे आसू

*संकलन : मिलिंद पंडित, कल्याण*

********************************