दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी सहकार्य करा – राज्यमंत्री दतात्रय भरणे

दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी सहकार्य करा – राज्यमंत्री दतात्रय भरणे
दि. 28: दिव्यांगांना प्रमाणपत्राच्या आधारे विविध शासकीय योजनांचा लाभ मिळणे शक्य असल्याने नागरिकांनी त्यांना प्रमाणपत्र वाटप शिबिराची माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
इंदापूर उपजिल्हा रुग्णालय येथे आरोग्य शिबिराच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुहास शेळके, डॉ. राजा राजपुरे, डॉ. माधवी चंदनशिवे, डाॅ.दिनेश वानखेडे, नायब तहसिलदार ठोंबरे, भिगवनचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, अपंग सेलचे रसाळ नाना,जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य, इंदापूर तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सागर मिसाळ,विविध मान्यवर , आरोग्य सेविका , कर्मचारी वर्ग व दिव्यांग मोठया संख्येने उपस्थित होते.
ना.भरणे यांनी प्रमाणपत्र वाटपासाठी शिबिर आयोजन उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले, या शिबिरामुळे तालुक्यातील दिव्यांगांना मुंबई किंवा पुणे येथे प्रमाणपत्रासाठी हेलपाटे मारावे लागणार नाहीत. स्थानिक स्तरावर सुविधा उपलब्ध झाल्याने त्यांचा त्रास कमी होण्यासोबत वेळ आणि खर्च वाचेल. पुढील महिन्याच्या चौथ्या बुधवारी डोळे आणि नंतर टप्प्याटप्याने मुखबधिर व मतिमंदासाठी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. याचा जास्तीत जास्त दिव्यांगाना लाभ घेता यावा यासाठी नागरिकांनी परिसरातील दिव्यांगांना शिबिराची माहिती द्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.