रेल्वे कार्यालयात सौर ऊर्जेचा प्रकाश,
सौर ऊर्जा यंत्रणा कार्यान्वित ,
वर्षांला १.४६ लाख युनिट वीज

पुणे : पुणे रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाच्या छतावर सौर ऊर्जा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून,
आता कार्यालयाला सौर ऊर्जेचा प्रकाश मिळणार आहे.
या प्रकल्पाच्या माध्यमातून दिवसाला ४०० युनिट, तर वर्षांला १ लाख ४६ हजार युनिट विजेची निर्मिती केली जाणार आहे.
कार्यालयाला आवश्यक दैनंदिन विजेची गरज या यंत्रणेच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकणार आहे.
हरित भारत संकल्पनेत योगदान देण्यासाठी सौर ऊर्जेच्या निर्मितीवर रेल्वेकडून गेल्या काही वर्षांपासून भर देण्यात येत आहे.
यापूर्वी पुणे रेल्वे स्थानकाच्या इमारतीवरही सौर ऊर्जा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
भारतीय रेल्वेने सन २०३० पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य ठेवले आहे.
हे लक्ष्य पूर्ण करण्याच्या दृष्टीने पुणे रेल्वेकडूनही पाऊले उचलली जात आहेत.
भविष्यात पुणे विभागातील इतर रेल्वे स्थानकांवरीही सौर ऊर्जा यंत्रणा बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
पुणे, शिवाजीनगर, खडकी आदी स्थानकांवर सौर ऊर्जा यंत्रणा बसविण्याचे काम सध्या प्रगतिपथावर आहे.
पुणे रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाच्या इमारतीवर बसविण्यात आलेली १०० किलो वॅट सौर ऊर्जा यंत्रणा पुणे रेल्वेच्या व्यवस्थापक रेणू शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यान्वित करण्यात आली.
अपर व्यवस्थापक नीलम चंद्रा, प्रकाश उपाध्याय,
वरिष्ठ विद्युत अभियंता जगनंदन प्रसाद मिश्रा आदी त्या वेळी उपस्थित होते.
रेल्वे ऊर्जा प्रबंधन कंपनीच्या वतीने पुणे रेल्वेच्या विद्युत विभागाच्या सहकार्याने ही यंत्रणा उभारण्यात आली आहे.

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!