*क्रांती आणि शांती*

अन्याय आणि अत्याचार करण्याची वृत्ती, घमेंड आणि अहंकारातून निर्माण होते. अशी माणसे नेहमी आपल्यापेक्षा कमजोर आणि दुबळ्या माणसांचा शोध घेत असतात. समाजामध्ये सगळेच सक्षम नसतात, त्यामुळे कमजोर आणि दुबळ्या माणसावर अन्याय करणारा घटक कोणत्या ना कोणत्या रूपाने नेहमी आपला दबाव टाकत असतो.
वास्तविक ही माणसे शूरही नसतात आणि वीरही नसतात, कारण *खरा शूरू वीर नेहमी अन्यायाच्या विरोधात लढत असतो, तो स्वतः कधीच अन्याय करत नाही आणि दुसऱ्याचा सहनही करत नाही.*
शूरत्व सर्वांच्या अंगीं नसते, अशा शूरत्व अंगीं नसलेल्या माणसाला नेहमी समाजातील शूरांचे आणि वीरांचे कवच तयार होत असते. अशा *आपल्या पेक्षा कमजोर आणि दुर्बल माणसाला जो संरक्षण देतो, इतरांच्या त्रासापासून वाचवतो त्यालाच क्षत्रिय म्हणतात, तेथे जातीचा आणि धर्माचा काहीच संबंध नाही.*
*क्षतात त्रायते इति क्षत्रिय l*
ही क्षत्रियांची खरी व्याख्या आहे.
आज समाज खऱ्या अर्थाने आशा गुणांनी क्षत्रिय नसलेल्या, स्वतः वीर व शूर नसलेल्या, घमेंडी आणि अहंकारी माणसापासून त्रस्त आहे. क्षेत्र कोणतेही असो हे दादागिरी करणारे लोक आहेतच.
काही लोक विनाकारण वाद नको, आपले त्याच्याशी काही देणेघेणे नाही, असे समजून दुर्लक्ष करतात, तर काही लोक आपल्याला कोणाचाही आधार नाही, म्हणून सहन करत असतात. त्यामुळे अशा लोकांचे साम्राज्य हळूहळू वाढत जाते. अशी *दादागिरी करणारी माणसे कितीही मोठी झाली, तरी त्यांना जनमान्यता कधीच मिळत नाही, एक विकृत माणूस म्हणूनच त्याच्याकडे पाहिले जाते, त्याला कधीही कोणाच्याही खऱ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद मिळत नाहीत, मिळतात ते सर्व तळतळाटच.*
कोणत्याही दादागिरी करणाऱ्या माणसाचा शेवट, हा त्याच्यापेक्षा वरचढ होऊ पाहणाऱ्या माणसाकडूनच होत असतो. *आपण जेवढे एखाद्यावर विनाकारण अन्याय आणि अत्याचार करत असतो, त्यावेळी आपल्यावर सूड घेणाऱ्या वृत्तीला आपणच जन्म देत असतो, हे कधीच विसरू नये.* आपला वैरी या निमित्ताने आपणाच जन्माला घालत असतो.
निर्वैर जीवन खऱ्या अर्थाने सर्वात सुखी आणि समाधानी असते. अशा व्यक्तीला काही विकृत लोकांचा त्रास सहन करावा लागतो, हे निश्चित आहे, परंतु त्याची सहनशीलता हीच त्याची खरी ताकद असते आणि या सहनशीलतेतूनच त्याच्या जीवनातील शांती जन्म घेत असते. *वाद घालणारी माणसे कधीच शांत राहू शकत नाहीत, वाद टाळणारी माणसे नेहमी शांत असतात.*
जी शांत असतात, तीच स्थिर असतात आणि तीच खऱ्या अर्थाने समृद्ध होतात. आपण कोणत्याही क्षेत्रात असो आपल्यापेक्षा वरचढ होऊ पाहणारा किंवा असणारा हा आपल्याला त्रास देणार , आपल्या कमजोरीचा आणि दुबळेपणाचा गैरफायदा घेऊन आपल्यावर अन्याय करणारा असणारच आहे.
*वरचढ असेल तर शिवरायांचे सूत्र वापरावे, गनिमी काव्याने त्याला नेस्तनाबूत करावे किंवा संयमाने सहन करून त्याच्याशी वैर टाळावे, हे दोनच मार्ग आपल्या हातात असतात.*
दोन्हीकडेही आपल्याला यश येते, आपली जशी वृत्ती असेल तशी कृती आपल्या हातून होत असते. या दोन्ही मार्गात गैर काहीच नसते. आपल्याला क्रांती हवी असेल तर पहिला मार्ग योग्य आहे आणि आपल्याला शांती हवी असेल, तर दुसरा मार्ग योग्य आहे.
*क्रांती आणि शांती दोन्ही एका वेळेला कोणत्याच क्षेत्रात शक्य होत नाही.*
सहनशीलता आणि नम्रता यामध्येही प्रचंड ताकद आहे, हे कृतीशिवाय अनुभवता येत नाही.
*नम्र झाला भूता l त्याने कोंडिले अनंता ll*
*हेच शूरत्वाचे अंग l हारी आणिला श्रीरंग ll*
डॉ. आसबे ल.म.
अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार.
मो.नं.9822292713.

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!